पुणे : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त गावाबाहेर असलेले मतदार कालच गावात पोहोचले आहेत. तर, आज सकाळपासूनच पुणे (Pune), मुंबई येथून गावी जाणाऱ्या मतदारांच्या कारची मोठी रांग महामार्गावर दिसून येत आहे. मुंबईकडून (Mumbai) पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे, मतदानासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना व मतदारांना अधिकचा वेळ लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुण्यातील खेड-शिवापुर टोलनाक्यावरची वाहतूक टोलमुक्त करण्यात आली आहे. मतदारांना उशीर होऊ नये, त्यांचा मतदानाचा हक्क वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांकडून टोल वसुल केला जात नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे, येथील वाहतूक टोल फ्री करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असल्याने लोक मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाच्या सूचनेवरुन ही एकेरी वाहतूक टोल फ्री करण्यात आल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात लोक मुंबई, पुणे शहरातून बाहेर पडले आहेत. तसेच, ट्रॅव्हल्ससह आपल्या चारचाकी वाहनांतून मतदार भरभरून जात आहेत, त्यामुळे येथील मार्गावरीलअनेक रस्ते जाम आहेत. विशेष म्हणजे आज मुंबई ते पुणे प्रवास तीन तांसाऐवजी तब्बल सहा ते 7 तासांचा झाल्याची माहिती आहे. प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे.
दुबईहून मतदानासाठी आला युवक
ठाण्यातील ओमकार भोसले हा दुबईला असलेला तरुण खास मतदानासाठी घरी आला आहे. दुबईतील ताज हॉटेलमध्ये कामानिमित्त गेले अनेक वर्ष आपल्या शहरापासून बाहेर राहतो. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती असलेल्या प्रेमापोटी आणि त्यांना मतदान करण्यासाठी चार दिवसाची सुट्टी काढून तो आवर्जून ठाण्यामध्ये आला आहे. त्यामुळे, स्वतः मुख्यमंत्री यांनी त्याची भेट घेतली, व त्याचे आभार देखील मानले आहेत. मी जेव्हा दुबईला येईल तेव्हा नक्की तुला भेटेल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोसले याला आश्वासन दिले.
दरम्यान, राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत असून मतदानाच्या दिवशी अवैध दारूचा मोठा साठा अकोल्यात जप्त करण्यात आला आहे. तसेच दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांसह एक क्रुझर वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पातूर शहरात ही कारवाई करण्यात आली. 77 हजाराच्या दारुसह एकत्रित नऊ लाखांवरील मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं