पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असल्याने हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील बनला आहे. येथील मतदारसंघात पुतण्या युगेंद्र पवार विरुद्ध काका अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील बुथवर दोन्ही कार्यकर्ते समोरा समोर आले आहेत. त्यातच, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यकर्त्यांवर दमदाटीचे आरोप केले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले. त्यावर, आता अजित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस यंत्रणा याबाबत पाहून घेतील, असेही अजित पवार म्हणाले.  


बारामतीतील बालक मंदिरातील मतदान केंद्रामध् अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धमकी दिली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. तसेच, येथील मतदारसंघात मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत असल्याचा प्रकार होत असल्याचेही शर्मिला पवार यांनी सांगितले. त्यावर, अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''तो आरोप धादांत खोटा आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वकाही आलं असेल. तसं काही असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहतील. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही धमक्या दिल्या नाहीत. माझा कार्यकर्ता असं कधीही करणार नाही, माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच, काही गैरप्रकार वाटत असल्यास पोलीस तक्राराची चौकशी करतील,'' असे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, मलाही माझा कार्यकर्ता सांगत होता, दादा मला आतमधून बाहेर काढलं. माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं होतं, त्यामुळे मी पण माझ्या कार्यकर्त्यांना तक्रार द्यायला सांगेन, असेही अजित पवारांनी म्हटले. 


दरम्यान, मतदानाची टक्केवारी कमी दिसत आहे, पण जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 


मतदान केल्यावर शाई लावलेलं बोट दाखवणारच ना?


अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बोट दाखवून इशारा करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला, असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर अरे वेड्यांनो...तुम्हीच दाखवता मतदान केल्याचं बोट दाखवा...मग मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवणार ना...दुसऱ्या बोटावर शाई लावली असती असती तर ते दाखवलं...असं म्हणत अजित पवारांनी मिडल फिंगरसह करंगळी दाखवली. शर्मिला पवारांच्या या आरोपामागे नेमकं कारण काय?, असा प्रश्नही अजित पवारांना विचारण्यात आला. यावर तुझेही केस गेलेत, माझेही गेलेत, तरी अजून यामागचे कारण समजले नाही, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केले. यानंतर पत्रकारांमध्ये देखील एकच हशा पिकला.