बीड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही शरद पवारांनी सडकून टीका केली.


शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर परळीत पुन्हा एकदा भाऊ-बहिणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याठिकाणी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे विद्यमान आमदार आहे.


बीडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार




  • परळी मतदारसंघ - धनंजय मुंडे

  • बीड मतदारसंघ - संदीप क्षीरसागर

  • केज मतदारसंघ - नमिता मुंदडा

  • माजलगाव मतदारसंघ - प्रकाश सोळके

  • गेवराईतून मतदारसंघ - विजयसिंह पंडित




शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागरांवर हल्लाबोल


विकास करण्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो, असं म्हणणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरद पवारांनी जोरदार टीका केली. पंधरा वर्षे मंत्रीपदी असताना जयदत्त क्षीरसागर यांनी नेमकं काय केलं, असा सवालही त्यांनी विचारला. केशरबाई क्षीरसागर यांनी गांधी नेहरु यांचा विचार कधी सोडला नाही. मात्र त्यांच्या पोराने स्वार्थासाठी आम्हाला सोडलं, असं म्हणत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांना आशीर्वाद द्या, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.



पाचही उमेदवारांचा राजकीय जीवनप्रवास




  • संदीप क्षीरसागर हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. 2004 पासून ते काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राजकारणात सक्रिय झाले. सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संदीप यांनी शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले आहे. काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात नगरपालिका निवडणूक लढवत, 20 नगरसेवक निवडून आणले तर तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सात पंचायत समिती सदस्य त्यांनी निवडून आणले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात आणि काका जयदत्त क्षीरसागर यांच्यात वाद सुरु झाले.

  • गेवराईतील विजयसिंह पंडित हे माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

  • केजमधून नमिता मुंदडा या माजीमंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा असून उच्चशिक्षित आहेत. 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

  • माजलगावमधील प्रकाश सोळंके हे माजीमंत्री असून सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत. कारखानदार असून तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले आहे.

  • परळीतून निवडणूक लढवणारे धनंजय मुंडे हे राज्याचे विरोधी पक्ष नेते असून त्यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे