Bhool Bhulaiyaa 2 OTT Release Date : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 175 कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. 'भूल भुलैया 2' हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 19 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 


नेटफ्लिक्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भूल भुलैया 2'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत नेटफ्लिक्सने लिहिले आहे,"भूल भुलैया 2'च्या रिलीज डेटची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. 19 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे". 'भूल भुलैया 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षक आनंदी झाले आहेत. 


बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा


'भूल भुलैया 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 175 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 176.14 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 92.05 कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यात 49.70 कोटी तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 21.40 कोटींची कमाई केली होती. तर चौथ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा पाहायला मिळत आहे. चौथ्या आठवड्यात या सिनेमाने 12.99 कोटींची कमाई केली होती. लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. 






'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


सेलिब्रिटींनं केलं सिनेमाचं कौतुक


अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, 'या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचे तसेच चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन. तर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'भूल भूलैय्या-2 चित्रपट हिट ठरल्याबद्दल कार्तिकला शुभेच्छा.


संबंधित बातम्या


Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा


Bhool Bhulaiyaa 2 OTT Release : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर 'भूल भुलैय्या-2' ओटीटीवर होणार रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित