मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रणनीतीची चुणूक दाखवली आणि पुरेसं संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीचा उमेदवार पडला.  देवेंद्र फडणवीस आताही त्याच प्रकारचं धक्कातंत्र द्यायच्या तयारीत आहेत. पण या निवडणुकीत त्यांचा सामना आहे तो त्याच तोडीचे राजकारणी असलेल्या अजित पवार यांच्याशी. राज्यसभेची धांदल उडाली असताना पिंपरीत उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त असणारे अजितदादा आता स्वत: अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.


राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीवर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आता अजितदादांनी सर्व सूत्रं हातात घेतली. दोन दिवसांपासून ते हॉटेलमध्ये ठाण मांडून असून अपक्षांशी संपर्क साधण्यापासून ते मतांचा कोटा ठरवणे या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष दिलं आहे. सोमवारी चमत्कार होणार असं सूचक वक्तव्य अजितदादांनी शनिवारी केलं. पहाटेच्या शपथविधीचा अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार ताब्यात कसं ठेवायचं याचा अनुभव ते एक उत्कृष्ट संघटक... असा सर्व अनुभव अजितदादांच्या पाठीशी आहे. 


राज्यसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांना अजितदादांनी स्पेस दिला? 
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे, भेटीगाठी आणि वाटाघाटी सुरु होत्या. पण अजितदादा मात्र पिंपरीतील उद्घाटन सोहळ्यांमध्ये व्यस्त होते. राज्यसभेच्या रिंगणात सहावा उमेदवार हा शिवसेनेचा होता, त्यामुळे सर्व सूत्रं ही सेनेच्या हातात होती. त्यावेळी संजय राऊत यांच्यापासून ते सुभाष देसाई आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूत्रं हालवली. पण मतांच्या गणितात शिवसेना फसली आणि देवेंद्र फडणवीसांनी अलगदपणे धनंजय महाडिकांना निवडून आणलं. या निवडणुकीत ज्या अपक्ष आमदारांनी दगाबाजी केली असा आरोप संजय राऊत यांनी केला, ते आमदार कुणाच्या जवळचे आहेत हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे राज्यसभेवेळी रिंगणाच्या बाहेर राहून अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना स्पेस दिली का सवाल अनेकांना पडला. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं सख्य सर्वांना माहिती आहे. या दोघांनीच पहाटेचा शपथविधी घेतला आणि महाराष्ट्रात भूकंप घडवला. आताही ते एकमेकांवर जास्त काही टीका करताना दिसत नाहीत. 


फडणवीसांचा कोल्हापुरात ट्रेलर... तर राज्यसभेत पिक्चर
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीची 10 मतं फोडली आणि त्यांचा उमेदवार निवडून आणला. अखेरच्या क्षणी त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेद्र फडणवीस हे शांत होते. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी अपक्षांच्या भेटीगाठी घेतल्या आणि रणनीती ठरवली. आताही दोन दिवस ते जास्त काही बोलले नाहीत. पण राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवरच ते म्हणाले होते 'आगे आगे देखो होता है क्या...' राज्यसभेत ओपन मतदान असताना महाविकास आघाडीची ही अवस्था, तर गुप्त मतदान असताना काय होईल पाहा असा इशारा त्यांनी दिला होता. 


फडणवीसांनी त्यांच्या रणनीतीची चुणूक ही कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत दाखवली होती. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी घाम फोडला होता. तो ट्रेलर होता, तर पिक्चर हा राज्यसभेच्या निवडणुकीतील निकाल होता. महाविकास आघाडीला त्यांनी जोरदार हादरा दिला. आताही त्यांनी जोरदार तयारी केली आहे आहे. 


अजितदादा अॅक्शन मोडमध्ये
राज्यसभेमध्ये बसलेल्या फटक्यामुळे महाविकास आघाडी आता सावधपणे भूमिका घेत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड एकमेकांसमोर आहेत. काँग्रेसला विजयासाठी आठ मतांची गरज आहे तर प्रसाद लाड यांना जवळपास 20 मतांची आवश्यकता आहे. पण राज्यसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजपला या वेळीही आपलाच उमेदवार निवडून येणार अशी आशा आहे. कारण यावेळी गुप्त मतदान असल्यानं महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपण फोडू शकतो असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. 


नेमकी हीच स्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीकडून आता अजितदादा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी बाजूला असणारे अजितदादा आता विधान परिषद निवडणुकीसाठी कधी हॉटेल ट्रायडंटमध्ये तर कधी बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, तर कधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. कारण आता विषय प्रतिष्ठेचा आहे.


अजितदादांच्या हाती सूत्रं
अजितदादा हे गेली दोन दिवस ट्रायडंटमध्ये ठाण मांडून असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे एक उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं आहेत, पण दुसऱ्या उमेदवारासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना वळवण्यासाठी थेट सगळी सूत्रं अजितदादांनी हाती घेतली आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांशी अजितदादांनी स्वतः चर्चा केली, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारासह वरिष्ठ नेत्यांशी अजितदादांनी चर्चा केली,  महाविकास आघाडीतील अपक्षांना त्यांनी फोन केला. प्रत्येक उमेदवाराला किती मतं द्यायची, अपक्षांनी कुणाला मतं द्यायची यावर दादांनी स्वतः लक्ष ठेवलं. तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकूण आणण्यासाठी त्यांनी फासे टाकले आहेत. 


महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा
विधानपरिषदेमध्ये जर देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली तर महाविकास आघाडीसाठी ती धोक्याची घंटा असेल. महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे पूर्ण झाली, तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता सरकार टिकवायचं असेल, आमदारांनी विश्वास द्यायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा विजय आवश्यक आहे.


आमदारांना सांगून पाडणारे अजितदादा...
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडी गाफिल राहिली आणि गणित चुकलं. त्यानंतर आता याच आकड्यांच्या खेळात भाजपचा विजय होऊ नये म्हणून त्यावर अजितदादांनी लक्ष केंद्रित केलंय. अजितदादांनी एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. अजितदादांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवतारे असोत वा मधुकर पिचड किंवा हर्षवर्धन पाटील... अशा अनेकांना घरी बसवलं, तेही सांगून. 


आताही विधानपरिषदेच्या निवडणुकीची सर्व सूत्रं ही अजितदादांनी हाती घेतली आहेत.... आणि समोर आहेत ते धुरंधर देवेंद्र फडणवीस. ही लढाई भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड किंवा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी नाही तर अजित पवार विरुद्ध देवेंद्रे फडणवीस अशीच आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीसांनी आखलेला चक्रव्यूह विधानपरिषदेत अजितदादा भेदणार का याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे.