मुंबई: विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर आली असताना महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य आणि समन्वयाचा अभाव आता समोर आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना फोन करतं असल्यामुळे ही नाराजी असल्याचं समोरं आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतरही आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं समोर येत आहे. 


शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांवर राष्ट्रवादीचा डोळा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून या अपक्ष आमदारांना फोन करण्यात येत असल्याची माहिती आहे. 


शिवसेनेला पाठींबा देणारे आमदार


1) मंजुळा गावित- अपक्ष
2) राजकुमार पटेल - प्रहार जनशक्ती
3) बच्चू कडू - प्रहार जनशक्ती
4) ॲड आशीष जयस्वाल - अपक्ष
5) शंकरराव गडाख - क्रांतिकारी शेतकरी पक्ष
6) राजेंद्र पाटिल यड्रावकर - अपक्ष
7) नरेंद्र भोंडेकर - अपक्ष
8) गीता जैन - अपक्ष


राष्ट्रवादीकडून होत असलेल्या या कृत्यामुळे आता सेनेत नाराजी आहे. आमदारांची फुटाफूट होऊ नये यासाठी उद्या होणारी आमदारांची बैठक ही आज तात्काळ आयोजित करण्यात आली अशी देखील माहिती समोर आली. या बैठकीत सर्वच आमदारांची बाजू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीचा विचार केला तर त्या निवडणुकीत शिवसेनेला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज होती. मात्र आता पार पडणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला 8 ते 9 मतांची तर राष्ट्रवादीला एका मताची गरज असणार आहे. परंतु गुप्तपद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे स्वतःच्याच पक्षातील मते फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कोणताच पक्ष कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं पाहिला मिळत आहे.


या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार तर छोट्या घटक पक्षांचे 16 आमदार देखील महत्त्वाचा रोल पार पाडणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चेत असणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षाची देखील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. मात्र बहुजन विकास आघाडीने अजूनही आपले पत्ते खोलले नाहीत.


एकिकडे महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव आणि नाराजी नाट्य सुरु असताना भाजपने मात्र विधान परिषदेसाठी सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या निवडणुकीत भाजपला आपला शेवटचा उमेदवार निवडून आणण्यासाठी 22 आमदारांची गरज लागणार आहे. त्यामुळे हा मोठा आकडा गाठण्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा यशस्वी होतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.