Vasai Virar City Municipal Corporation Election 2022 : लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनाही यामध्ये मागे नाही. मुंबईसोबतच इतर महापालिकांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. अशातच आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेना युवानेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं शिवसेना प्रवक्ते आणि नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी सांगितलं आहे. सचिन अहिर हे वसईत एका खाजगी कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी वसई कोर्टाजवळच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी आगामी वसई-विरार पालिका निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली.


वसई विरारमधील निवडणुकांत शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचा चेहरा : सचिन अहिर 


"वसई विरारमध्ये बदल घडवायचा असेल तर महाविकास आघाडीनं एकत्र येणं गरजेच आहे. कार्यकर्त्यांनी परिवरर्तनाची जिद्द बांधली आहे. वसई विरारमधील निवडणुकात आदित्य ठाकरेंचा चेहरा असणार आहे. कारण वसई विरारमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. येथील जनतेला विकास पाहिजे आहे. येथील जनता जात धर्माच्या राजकारणात अडकत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील पालिका निवडणुका लढवल्या जातील.", असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.  


संभाजीराज्यांचा विषय आता आला, मात्र सहावा उमेदवार आधीपासूनच ठरलेला : सचिन अहिर 


सचिन अहिर यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "राज्यसभा निवडणुकांबाबत आम्ही शेवटपर्यंत नाव जाहिर केलं नाही. संभाजीराज्यांबद्दल आदर राहील. मात्र राजकारणात प्रत्येक क्षण एकच असतात असं नाही. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहिर केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून नाव जाहीर झाल्यानंतर आता चर्चा नको. संभाजीराज्यांचा विषय आता आला. मात्र सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता."


सेनेच्या मंत्र्यांना वेळ नाही : सचिन अहिर 


अहमदनगर येथील घटना आणि वसईच्या नायगांव येथील पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याची खंत शिवसैनिकांत आहे.  त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत, याबाबत बोलताना, सचिन आहिरे यांनी म्हटलं की,  "मी स्वतः याकडे लक्ष देईन. आपण कोविडमधून आता बाहेर पडलो असल्यानं, मंत्र्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही." असं सांगून त्यांनी मंत्र्यांची पाठराखण केली.


राज ठाकरेंचा भोंगा आता बंद : सचिन अहिर 


"राज ठाकरेंचा भोंगा आता बंद झाला आहे. भोंग्याची वायर, एम्पिलिफायर हे कुणाच होतं. हे आता सर्वांना माहीत पडलं आहे. ज्यांच्या भोंगा वाजवत होते, त्यांनीच आता त्यांच्यावर ट्रॅप करणार असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरेंना आता दुर्दैवानं प्रत्येक भूमिकेतून माघार घ्यावी लागत आहे.", असं ते म्हणाले. 


"राणा परिवार हे स्वतःच पुनर्वसन करण्याचं काम करत असल्याचा आरोप करुन,  त्यांचा जातीचा दाखला मुंबई उच्च न्यायालयानं अवैद्य ठरवला आहे. सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. भविष्यात स्वतःचा मतदार संघ शाबूत राहिल का? हे त्यांना माहित नाही.  आणि ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतायत.", असा मिश्किल टोलाही अहिर यांनी यावेळी लावला. आपल्या मतदार संघात हुनमान चालिसा वाचण्याची हिंमत आहे का? असा प्रश्नही यावेळी अहिर यांनी विचारला आहे. तसेच यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनाही टोला लगावला. "किरीट सोमय्या यांचे आरोप किती सिरीयस घ्यायचे हाच प्रश्न आहे. आरोप करण्यापेक्षा समाजात आपण आपल्या कृतीतून काही चांगली भूमिका घेऊ का? याविषयी बघितलं पाहिजे.", असं अहिर म्हणाले.