वसई : वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही शहरात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरांचं एकहाती वर्चस्व आहे.  गेल्या तीस वर्षांपासून येथील जिल्हापरिषद, ग्रामपंचायती, महानगरपालिकेची सत्ता ठाकूरांच्या ताब्यात आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी गेले अनेक वर्ष शिवसेना भाजपने प्रयत्न केले. मात्र नेहमी ते अयशस्वी राहिले.  अपवाद वसई विधानसभेचा 2009 च्या निवडणुकीचा आहे. त्यावेळी महापालिकेतून गाव वगळण्याच्या मुद्दयावरून संपूर्ण गाव पेटून उठलं होतं.  त्यात शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून विवेक पंडितांनी बाजी मारली होती.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत पालघरचा गड महायुतीने जिंकल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. त्यामुळे यंदा वसई विधानसभेत इच्छुकांची मंदियाळी दिसत आहे. मोदींच्या जादूने आता वसईच्या राजकारणात नव्याने बदल होण्याची शक्यता महायुतीची वाढली असली तरी या लोकसभेत बहुजन विकास आघाडीला 11,309 मतांची वसईत आघाडी मिळाली आहे.  असं असलं तरी नालासोपारामध्ये ज्या प्रकारे एका मोठ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याने चुरस वाढली आहे. तसा महायुतीच्या गोटात तरी अजून तगडा उमेदवार दिसून येत नाही.

2009 मध्ये विवेक पंडित यांना 81,358 मते मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार नारायण माणकर यांना 64,560  मते मिळाली होती. 16,789 अधिक मतांनी विवेक पंडीत विजयी झाले होते.  मात्र त्यानंतर 2014 साली स्वतः हितेंद्र ठाकूरांनी वसईच्या मैदानात उडी मारली. पंडितांपेक्षा 31,896 मतांची आघाडी घेऊन आपला बालेकिल्ला परत मिळवला.  यंदा मात्र नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मांच्या इन्ट्रीमुळे सध्या हितेंद्र ठाकूर नालासोपाऱ्यातून स्वतः उभे राहण्याची शक्यता आहे. तर वसई येथून आपल्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उतरवण्याची शक्यता आहे. हे सर्व गणितं ऐन क्षणी हितेंद्र ठाकूर बदलू ही शकतात. मात्र प्रदिप शर्मा यांना नालासोपाऱ्याबरोबर वसईचा गड जिंकण्याची जबाबदारी वरिष्ठांनी सोपवली आहे.

असं असलं तरी विरोधी गटात अजूनही तगडा उमेदवार दिसून येत नाही. नालासोपारा विधानसभा शिवसेनेला गेल्याने वसईची सीट ही भाजपला जाणार हे नक्की मानलं जातंय. त्यातच भाजपच्या गोटातून ख्रिस्ती उमेदवार देण्याची चाचपणीही सुरू आहे. कारण मुंबई खालोखाल ख्रिस्ती समाजाचे सर्वाधिक प्राबल्य वसई तालुक्यात आहे. येथील ख्रिस्ती लोकांची मते अंदाजे 30 टक्क्यांच्या आसपास आहेत. दोन दशकांपूर्वी अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी महाराष्ट्र मंत्रिमंडळात हमखास असायचा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत  ज्येष्ठ कवी, साहित्यिक सायमन मार्टिन, तसेच मुख्याध्यापिका आणि गाव बचाव आंदोलनाच्या सक्रिय कार्यकर्त्या डॉमनिका डाबरे यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

मागील निवडणुकींचा इतिहास पाहिला तर 2009 च्या वसई विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर जिमी गोन्सालवीस निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र त्यांना अवघी 8,695 मते मिळाली. तर 2014 ला कॉंग्रेसमधून मायकल फुटयार्डो उभे राहिले होते. त्यांनाही 16,465 मते मिळाली. त्यामुळे ख्रिस्ती समुदायाची मतं ही ख्रिस्ती उमेदवाराला अवघी 8 टक्के पडत असल्याचं ही दिसून आलं आहे.

वसईत प्रामुख्याने महापालिकेतून गावे वगळण्याचा मुद्दाच निवडणुकीच्या जिंकण्याचं किंवा पराभवाचं कारण असतो. यंदाही याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातील हे नक्की. 2009 रोजी वसई विरार महानगरपालिका स्थापन झाली.  त्यात नवघर-माणिकपूर, वसई, विरार  आणि नालासोपारा या चार नगरपरिषदा आणि 52 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र पश्चिम पट्ट्यातील 29 गावांनी महापालिकेत जाण्यासाठी मोठा विरोध केला होता. 2009 ची निवडणूक याच मुद्द्यावर विवेक पंडीत जिंकले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायलयात प्रलंबित आहे. मात्र लोकसभेची निवडणूक आली की, मुख्यमंत्री गावं वगळण्याचं आश्वासन देतात. नंतर हा मुद्दा जैसे थे राहतात.

पावसाच्या पहिल्या सरीतच येथील रस्ते पाण्यात जातात. घरात, औद्योगिक वसाहतीत पाणी शिरुन, लाखोंचं नुकसान होत आहे. वीजेची समस्या देखील इथे महत्वाची आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र पाच वर्षात आमदार फंड आणि महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे. सुर्या योजनेतून अतिरिक्त 100 एम.एल.डी. पाणीपुरवठा शहरात सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असल्याच सांगितलं आहे. तर मतदार संघातील रस्ते गटारे, उद्याने मोठ्या प्रमाणात विकसित केल्याचही सांगितलं आहे.
वसई विधानसभेत 2014 साली विवेक पंडीत पराभूत झाल्यानंतर ते  अज्ञातवासातच गेले होते. त्यामुळे याकाळात प्रखर विरोधी गट थंड झाला होता. लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागून कामगिरी बजावल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना एसओएम अर्थात स्टेट ऑफ मिनिस्टर हा दर्जा दिला आहे. सध्या तरी त्यांना वसईतून विधानसभेत निवडणूक लढवण्याचा कोणताही रस दिसून येत नाही. मात्र पर्याय नसल्यास आपण तयार असल्याचंही ते सांगत आहेत.

इतर पक्षाचेही अनेक उमेदवार निवडणुकीसाठी तयार आहेत. वसईतील तळागातळातील प्रश्नासाठी लढणारे मिलिंद खानोलकर, वसईच्या हरित पट्ट्यासाठी लढणारे समीर वर्तक, कॉंग्रेसचे नेते विजय पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. तसेच येथे आगरी सेनाही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. सध्या आगरी सेना तुंगारेश्वर येथील सदानंद बाबांचं आश्रम वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. त्यांचं आश्रम जे वाचवतील त्यांना प्रामुख्याने त्यांचा पाठिंबा असणार आहे.

वसई विधानसभेत 2019 च्या लोकसभेनुसार पुरूष 1,51,804, महिला 1,41,724 तर तृतीयपंथी 7 असे एकूण 2,94,535 अशी मतदार संख्या आहे. वसई विधानसभेत विविध समाजाची लोकं आहेत.  आगरी, कोळी, वाडवळ, कुणबी, कुपारी, कॅथलिक, मुस्लिम, गुजराती समाजाचं येथे प्राबल्य आहे. वसई विधानसभेत विरोधकांचं भवितव्य हे तगड्या उमेदवारावर अंवलबून असेल. नाहीतर पुन्हा एकदा वसई विधानसभेत बहुजन विकास आघाडी बाजी मारेल हे नक्की.