Uttar Pradesh Assembly Election 2022 : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पाच राज्यांमध्ये सध्या जोरदार प्रचार सरु आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उद्या (10 फेब्रुवारी) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदशमध्ये पहिल्या टप्प्यातील 58 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 11 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी भाजप, समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपा या सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात मतदान?
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 58 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या जागा आग्रा, अलीगढ, बागपत, बुलंदशहर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मथुरा, मेरठ, मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांतर्गत येतात. यूपीमध्ये एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषीत केले जातील.
भाजप आणि समाजवादी पक्षाने शेवटच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला
काल यूपीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने आणि समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. दोन्ही पक्षांना उत्तर प्रदेशच्या जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली आहेत. एकीकडे भाजपने 'लोककल्याण संकल्प पत्र' या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर दुसरीकडे सपाने 'समाजवादी वचन पत्र' या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
मतदानाचे टप्पे
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान
10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, गाझियाबाद आणि नोएडासह दिल्लीच्या सीमेपासून 100 मीटरच्या आत येणारी सर्व दारूची दुकाने मंगळवारी संध्याकाळपासून पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत. दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी जारी केलेल्या नोटीसनुसार, 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 10 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत (मतदानाच्या 48 तास आधी) दारुची दुकाने बंद राहणार आहेत.