अमेठी : उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेंद्र सिंह स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय होते, तसेच अमेठीमधील प्रचारात ते नेहमी स्मृती इराणी यांच्यासोबत दिसत होते. सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेला स्वत: स्मृती इराणी उपस्थित होत्या आणि त्यांचा सुरेंद्र यांच्या पार्थिवाला खांदा दिला.


मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह स्मृती इराणी यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करुन घरी परतले होते. त्यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना घरात घुसून गोळ्या झाडल्या. त्यावेळी जखमी सिंह यांना कुटुंबियांनी लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण परसलं आहे.



याप्रकरणी सात जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, सुरेंद्र सिंह यांच्या मुलाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.


सुरेंद्र सिंह बरौलिया गावचे रहिवासी होते. त्या गावचे ते सरपंचही राहिले होते. स्मृती इराणी यांनी एका जाहीर सभेत सुरेंद्र सिंह यांनी एकाच गावात 16 कोटी रुपयांची काम केल्याचं सांगत कौतुक केलं होतं. बरौलिया गावाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतलं होतं.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बरौलिया गावाला प्रसिद्धी मिळाली होती. याठिकाणी भाजपने लोकांना बुटं वाटल्याने, काँग्रेसने हा अमेठीचा अपमान असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बरौलिया गाव चर्चेत आलं होतं.