Jaysinh Mohite Patil , माळशीरस : माळशिरसच्या राखीव मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचाराचा नारळ आज (दि.4) अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर फुटला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ,जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मोहिते व जानकर गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दर निवडणुकीपूर्वी जयसिंह मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्याचा विजयाचा आकडा प्रचाराच्या शुभारंभात जाहीर करतात. आजवर त्यांनी सांगितलेला आकडा चुकलेला नाही. मोहिते पाटलांचा एवढा पगडा माळशीरस या मतदारसंघावर आहे.
माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र
लोकसभा निवडणुकीपूर्वी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले होते. लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला जानकर असा अलिखित करार या दोन गटात झाला होता. त्यानुसार उत्तम जानकर यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळताच अकलूजच्या परंपरेप्रमाणे शिवरत्न बंगल्यावर आज प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी सर्वांचे लक्ष जयसिंह मोहिते पाटील हे कोणता आकडा सांगतात? याकडे होते.
मी आता लंगोट बांधली आहे, उत्तम जानकर हे एक लाख एक हजार मताने विजयी होतील
दरम्यान, जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर हे एक लाख एक हजार पेक्षा जास्त मताने विजयी होतील अशी घोषणा केली आहेृ. गेल्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या मदतीने विजयी झालेले भाजप आमदार राम सातपुते हे सध्या रिंगणात असून त्यांच्या गटाकडून आपल्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा दावा केला जात होता. ती अदृश्य शक्ती म्हणजे मीच असल्याचे सातपुते यांचे म्हणणे असले तरी मी आता लंगोट लावली असून या वेळेला उत्तम जानकर हे एक लाख एक हजार मताने विजयी होतील, असा टोलाही जयसिंह मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना लगावला. ज्या पद्धतीने जयसिंग मोहिते पाटील यांनी निवडणुकीचा निकाल आज जाहीर केला त्याच पद्धतीने एक लाखापेक्षा जास्त मताने आपण विजयी होऊ आणि 23 चा गुलाल आपलाच असेल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकारी यांनी माझाशी बोलताना केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या