UP 7th Phase Polling : सध्या उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. या शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 9 जिल्ह्यात मिळून 22 टक्के मतदान झाले आहे. आत्तापर्यंत सर्वात जास्त मतदानाची नोंद ही मऊ जिल्ह्यात झाली आहे. मऊ जिल्ह्यात आत्तापर्यंत 24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  


दरम्यान, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मतादानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. 94 वर्षीय मंगेश्वरी देवी आणि 91 वर्षीय लल्ली देवी यांनी गाझीपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दोघेही स्वातंत्र्यापासून आपला आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.


कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान
आजमगढ : 20.12 टक्के
मऊ : 24.74 टक्के
जौनापूर : 21.84 टक्के
गाझीपूर : 19.35
चंदौली : 23.43 टक्के
वाराणसी : 21.21
मिर्जापूर : 23.41 टक्के
भदोही : 22.24 टक्के
सोनभद्र : 19.68 टक्के


आज शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच योगी सरकारमधील 7 मंत्र्याची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. देशातील पाच राज्यापैकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातव्या टप्प्यासाठी एकूण 2 कोटी 6 लाख मतदार आहेत. यामध्ये 1 कोटी 10 लाख पुरुष आणि 96 लाख महिला मतदार आहेत. या फेरीत 1 हजार 17 तृतीयपंथी मतदारही आहेत.


दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विजयाचे दावे केले आहेत. दोघांनीही 300 च्या पुढे जागांवर आपल्याला विजय मिळणार असल्याचे दावे केले आहेत. दोघांनीही उत्तर प्रदेशमध्ये आम्हीच सत्ता स्थापन करु असा दावा केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: