UP Election 2022 : उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पाचवा टप्पा पार पडत आहे. या पाचव्या टप्प्यात आज 12 जिल्ह्यातील 61 जागांवर मतदान पार पडणार आहे. या टप्प्यासाठी दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेतल्यचे पाहायला मिळाले. पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. या 61 जागांसाठी 693 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.


कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान 


पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यात 61 जागांसाठी 693 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी 90 महिला उमेदवार आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी यूपीमध्ये सुमारे 2.24 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1.20 कोटी पुरुष, 1.05 कोटी महिला आणि 1 हजार 727 तृतीय लिंग (ट्रान्सजेंडर) मतदार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती आणि गोंडा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 


पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे त्यांच्या जिल्ह्यातील कौशांबीच्या सिरथू विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने अपना दल (कम्युनिस्ट) नेत्या पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी पटेल यांची बहीण आणि केंद्र सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल या केशव प्रसाद मौर्य यांच्या बाजूने प्रचार करत आहेत.


या टप्प्यात अयोध्या ते प्रयागराज आणि चित्रकूट या धार्मिक भागात मतदान होणार आहे. अमेठीच्या माजी संस्थानाचे प्रमुख संजय सिंह यावेळी अमेठीतून भाजपचे उमेदवार आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ ​​मोती सिंह, प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी, खादी आणि उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, प्रयागराज जिल्ह्याचा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी या जिल्ह्याच्या दक्षिणेतून नशीब आजमावत आहेत. तर समाजकल्याण मंत्री रमापती शास्त्री गोंडा जिल्ह्यातील सुरक्षीत मानकापूर आणि राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय चित्रकूट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.