मुंबई : आघाडीतल्या बिघाडीवर अद्याप तोडगा निघालेला नसताना शिवसेना-भाजप युतीनंतर आता घटकपक्षांनीही बंडाचा झेंडा फडकवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या सेना- भाजप आमदारांच्या स्नेहभोजनाला युतीतल्या घटकपक्षांनी चहापानाने उत्तर दिलं आहे.

युती झाल्यानंतर तळागळातल्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व आमदारांसाठी 'वर्षा' बंगल्यावर गोड जेवणाचा बेत ठरला. मात्र जुन्या घटकपक्षांना डावलल्यामुळे 'वर्षा'लगतच असलेल्या रासप नेते आणि मंत्री महादेव जानकर यांच्या 'मुक्तागिरी' बंगल्यावर नाराज नेत्यांनी 'चाय पे चर्चा' केली

लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबई, लातूर, रामटेक आणि सोलापूर पैकी एका जागेची मागणी केली आहे, तर महादेव जानकर यांना बारामतीची निवडणूक 'कप बशी' या चिन्हावर लढायची आहे. सदाभाऊ खोत यांना शिवसेनेचा दावा असलेल्या हातकणंगले  मतदारसंघातून राजू शेट्टी यांना आव्हान द्यायचं आहे.

आता शिवसेनेला मिठीत घेतलेल्या भाजपला घटकपक्षांची साथही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे नाराज घटकपक्षांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाजपला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार असंच दिसतंय.