उल्हासनगर : आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1 तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 36 जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेच्या टाऊन हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती तसेच सर्वसाधारण महिला खुला वर्ग असे मिळून एकूण 30 प्रभागांमधून 15 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला नगरसेविका निवडून जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये या आरक्षणामुळे दिग्गजांना यामध्ये कुठेही फटका बसलेला नाही.
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, मनिष हिवरे, श्रद्धा सकपाळ यांनी सोडत काढून मंगळवारी सकाळी टाऊन हॉल येथे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही निवडणूक तीन सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार असून 89 नगरसेवक निवडून जाणार आहेत. 50 टक्के आरक्षणानुसार 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. उल्हासनगर मध्ये प्रभाग 1 अ ही एकच जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून मागील निवडणुकीत ही जागा सर्वसाधारण होती, यंदा ती महिलेसाठी राखीव करण्यात आली.
एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी 8 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी 3, 4, 5, 10, 11, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 25, 27, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 4, 5, 13, 14, 18, 21, 25, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
89 पैकी 45 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 36 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. या जागा 1ब, 2अ, 3ब, 4ब, 5ब, 6अ, 7अ, 8अ, 9अ, 10ब, 11ब, 12अ, 13ब, 14ब, 15ब, 16अ, 17अ, 18ब, 19ब, 20ब, 21ब, 22अ, 23अ, 24अ, 25ब, 26अ, 27ब, 28अ, 29अ आणि 30ब ह्या जागा आयोगाने आरक्षित केल्या होत्या.
सर्वसाधारण महिलांकरिता ब वर्गाच्या 6 जागांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 8ब, 12ब, 22ब, 26ब, 28ब, 29ब हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12, 22, 26, 28, 29 या प्रभागांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह 10 प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. दोन सदस्यीय पॅनल 16 मध्ये एक महिला सर्वसाधारण आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण आहे.