नवी दिल्ली : UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. त्याने पहिल्या तीन क्रमांकावर कब्जा केला आहे. पण चौथ्या क्रमांकावर कोण? मुलगा की मुलगी? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. याची सुरुवात एका आयएएस अधिकाऱ्याच्या ट्वीटनंतर झाली.


UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर IAS सोमेश उपाध्याय यांनी सगळ्यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी असं आपण बऱ्याच काळापासून ऐकत आलो आहोत. आता यूपीएससी परीक्षेत देखील मुली टॉप करत आहेत यात आश्चर्य नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या चार क्रमांकावर महिला आहेत.






आयएएस सोमेशच्या या ट्विटनंतर अनेक यूजर्सनी त्यांना आठवण करुन दिली की टॉप 4 रँकमध्ये सर्वच महिला नाहीत. यूपीएससी परीक्षेत चौथा क्रमांक मिळवणारा पुरुष असून त्याचं नाव ऐश्वर्य वर्मा आहे. त्याचवेळी, काही नेटकऱ्यांनी म्हटलं की कदाचित नावामुळे आयएएस सोमेश यांचा गोंधळ उडाला असेल.




UPSC परीक्षेत ऐश्वर्य वर्मा मुलांमध्ये पहिला आला असून त्याचा ऑल इंडिया रँक चौथा आहे. एका मुलाखतीत ऐश्वर्यने सांगितलं की, लोक अनेकदा मला माझ्या नावावरुन चिडवायचे. माझे नाव ऐश्वर्य आहे, ऐश्वर्या नाही हे मी नेहमीच सर्वांना सांगण्याचा, पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण लोक कायमच माझ्या नावावरुन गोंधळात पडायचे.


आयएएस सोमेश उपाध्याय यांच्या ट्वीटवर शेकडो यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  @amitkamboj8195 युझरने लिहिलंय की, 'सर, यूपीएससी परीक्षेत चौथा क्रमांकावर मुलगा असून त्याचं नाव ऐश्वर्य आहे. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखतो.






तर @Dost_Mohammed18 युझरने म्हटलं आहे की, पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या महिला आहेत, चौथा क्रमांक पुरुषाने मिळवला आहे. काही ट्विटर युजर्सने असंही म्हटलं की, "नावामुळे आयएएस सोमेश यांचा काहीसा गोंधळ झाला असावा."






दरम्यान UPSC परीक्षेचा निकाल सोमवारी (30 मे) जाहीर झाला, ज्यामध्ये श्रुती शर्माने अव्वल क्रमांक पटकावला. अंकिता अग्रवालने दुसरं आणि गामिनी सिंगलाने तिसरं स्थान मिळवलं. UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.


संबंधित बातम्या