यावेळी उदयनराजेंनी नोटबंदी आणि जीएसटीवर त्यांनी सडकून टीका केली. यावेळी उदयनराजे म्हणाले की, आम्ही तुमच्यामुळे आहोत, तुम्ही लोकशाहीचे राजे आहात. यांना फक्त तुमचे मत हवे, तुमची किंमत नाही. आम्ही तुमची किंमत करतो, तुम्ही राजे आहात. ही लोकं स्वार्थापोटी एकत्र आलेली लोकं आहेत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, पाच वर्षात खऱ्या अर्थाने मन की बात केली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्या जागी मी, पार्थ, शशिकांत शिंदे असते तर नंदनवन केलं असतं. पण हे केवळ मन की बात करत बसले. हे म्हणत होते 'धन की बात' आणि आवाज येत होता 'मन की बात', असा टोलाही त्यांनी लगावला.
पाच वर्षात कोणाचे वडील, कोणाचे भाऊ शहीद झाले. पाच वर्षात देशाची ही अवस्था झाली. हे दलाल कशाला लागतात. यांनी देश विकला आहे. मी सांगतो (चुटकी वाजवून) उदयनराजे करून दाखवणार, असं ते म्हणाले. शेवटी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालोय. यांच्याकडे बघूनच घेतो. पण कधी ते तुम्ही ठरवायचं आहे. प्रत्येक जण अवली असतो, मी पण आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, मी यांना काय कडेलोट करणार नाही. यांना आयुष्य एवढं मिळावं आणि त्या आयुष्यात त्यांनी पश्चाताप भोगावा. जनतेला जो त्रास दिला, त्याच्या यातना त्यांना मरेपर्यंत मिळाव्यात. त्यांच्यावर मरण मागण्याची वेळ यायला हवी, असं ते म्हणाले.