मोहाली : कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या जबाबदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. बंगलोरचा यंदाच्या आयपीएलमधला सात सामन्यातील हा पहिलाच विजय ठरला.


पंजाबनं बंगलोरसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट आणि डिव्हिलियर्सच्या अर्धशतकांमुळे बंगलोरनं हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार पाडलं. विराटनं 53 चेंडूत 68 तर डिव्हिलियर्सनं नाबाद 58 धावांची खेळी उभारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची निर्णायक भागीदारी रचली.


त्याआधी ख्रिस गेलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं बंगलोरसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ख्रिस गेलची 64 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. गेलच्या या खेळीत दहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.


गेल वगळता पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. त्यामुळे पंजाबला 20 षटकांत चार बाद 173 धावांचीच मजल मारता आली. बंगलोरकडून यजुवेंद्र चहलनं दोन तर मोईन अली आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक विकेट घेतली.