मुंबई : युतीच्या तहात जिंकलो आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचं आहे, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. युतीच्या घोषणेनंतर 'मातोश्री'वर आलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच संबोधित केलं. 'मी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला आहे का?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारताच, एकसूराने 'हो, शंभर टक्के' असं उत्तर आलं.


प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडीमध्ये गेलेला आहे. जर अविचारी पक्ष एकत्र येतात मग समविचारी पक्ष का नाही? गेल्या काही दिवसात भाजप नेतृत्वाकडून येणारा अनुभव बदलला आहे. म्हणून आपण युती केली, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

आधी, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा करार होता. मात्र मी ते स्वीकारलं नाही. मी समसमांतर आणलं. आपलं जे स्वप्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचं, ते मी पूर्ण करणारच, असा आशावादही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

युतीमध्ये समांतर आणलं आहे, जागावाटप आणि सत्तेतही समांतर सन्मान मिळणार आहे असं सांगत आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

युद्धात जिंकतात आणि तहात हरतात, असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं मी तहात हरलो की जिंकलो? जर मी तहात जिंकलो असेन, तर आता युद्ध तुम्हाला जिंकायचं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो, मी एक जागा वाढवून घेतली आहे, असंही उद्धव म्हणाले.

शिवसेना आणि भाजप यांनी 18 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युती करण्याची घोषणा केली. शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजप 25 जागा लढवणार आहे. जनभावनेचा आदर करत युती करत असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला होता.

दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघावरुन शिवसैनिकांचा दबाव वाढला आहे. कारण मुलुंडमधील शिवसैनिकांसह शिशिर शिंदे 'मातोश्री'वर पोहचले होते.