परभणी : भ्रष्टाचाऱ्यांना उमेदवारी देऊन आमचे फोटो लावून प्रचारातही भ्रष्टाचार करणाऱ्या आणि तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्यांना आवरा. आपले सबंध चांगले आहेत, ते खराब करू नका, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रासपच्या महादेव जानकर यांना परभणीच्या पालम येथे चांगलेच खडसावले.


आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम शहरात जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी इथून रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत त्यांनी गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली. सोबतच गुट्टे यांना उमेदवारी देणाऱ्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांना खडसावले.

गंगाखेड विधानसभा मतदार संघ शिवसेनेला सुटलेला असताना इथे रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या जाहीर बंडखोरीबाबत त्यांनी गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच गुट्टे यांना उमेदवारी देणाऱ्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांना खडसावले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही यावेळी युती केली नसती तर सरकार अस्थिर राहिले असते म्हणून युती करावी लागल्याचे ते म्हणाले. सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही. आता सरकार येऊ द्या मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

उद्धव म्हणाले की, पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाला होता. विमा कंपनीचे दलाल पैसे घ्यायला येतात, मात्र पैसे देत नाहीत. पण त्यांना शिवसेनेने जागेवर आणत 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी द्यायला भाग पाडले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी किती खायचे यावरही काहीतरी त्यांनी विचार करायला हवा. थोडी लाज बाळगायला हवी, अशा शब्दात त्यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली. आमच्यासमोर लढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिल्लक राहिली नसल्याचेही ते म्हणाले.

 मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा
औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठीही उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी  ठाकरे यांनी बोलताना आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचं भांडण पाकिस्तानसोबत आहे. आपण इथं भांडत बसू नये तर एकत्र राहून पाकड्यांना नामोहरम करू, असं  ठाकरे म्हणाले.  विरोधकांना सध्या  सभेला गर्दी जमत नाही म्हणून माणसं भाड्याने आणावे लागतात, पण आमच्या सभेत कुणी 'भाडखाऊ' नाही असं उद्धव म्हणाले. आम्हाला लोकं विचारतात तुमच्यात अब्दुल सत्तार कसे? आज आमच्याकडे सत्तार आहेत उद्या सत्ता येईल, आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.  समोर कुणीही असलं तरी अब्दुल भाई वाघ आहेत आणि ते जिंकणारच, असेही ते म्हणाले.  मी खोटे आश्वासन देणारा नेता नाही. आम्ही खरे सांगतो आणि आश्वासन पूर्ण करतो. माझा वचननामा मी पूर्ण करणारच. मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.