जळगाव : लडाख, जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नाही तर हे भारताचं मस्तक आहे, देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत, अशा शब्दात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 370 च्या मुद्द्याला हात घालत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी राष्ट्रविरोधी सूर लावत असल्याचं सांगत मोदींनी यावेळी टीका केली.


महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावात आज मोदींची पहिली प्रचारसभा पार पडली. काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहे. मी विरोधकांना आव्हान देतो. मैदानात या. तुमच्यात हिंमत असेल तर कलम 370, 35 ए आणि तिहेरी तलाक निर्णय बदलण्याची जाहिरनाम्यात घोषणा करा, असं यावेळी मादी म्हणाले.

कसं काय जळगाव, तुम्ही महाजनादेशाला मतं देणार ना? असं म्हणत आपल्या नेहमीच्या शैलीत मोदींनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली.  यावेळी मोदी म्हणाले,  गेल्या 70 वर्षांपासून जम्मू काश्मीरातील वाल्मिकी बंधूना जगण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं. जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचं शिर आहे. तिथलं संपूर्ण जीवन भारताला मजबूत बनवण्याचं काम करते. आम्ही संपूर्ण सावधगिरी बाळगत आम्ही पाच ऑगस्टला कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. चाळीस वर्षांपासून तिथं अशांतता होती. मी वचन देतो चार महिन्यात काश्मीरातील पूर्वपदावर आणणार, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष राष्ट्रहितासाठी घेतलेल्या या निर्णयाचं राजकारण करत आहे. हे पक्ष महाराष्ट्रात मत मागण्यासाठी येत असून, त्यांच्या मुलाखती बघा. त्यांची भूमिका शेजारी देशाच्या भाषेसारखी आहे. जम्मू काश्मीर विषयी देश जो विचार करतो. त्याच्या उलट विरोधक विचार करतात. देशाच्या भावनेसोबत उभं राहण्यात त्यांना संकोच वाटत आहे, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरला पूर्वपदावर आणण्यासाठी कटिबद्ध आहे,  मी तुम्हाला वचन देतो, असंही मोदी म्हणाले.