लातूर : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॅग निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती. यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी गेल्यानंतर हेलिपॅडवरच उद्धव ठाकरेंची (Uddhav thackeray) बॅग तपासणी करण्यात आल्याने ते चांगलेच संतापले होते. तसेच, माझ्यासह मिंधे, मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचीही बॅग तपासणी केल्याचे व्हिडिओ मला पाठवा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, त्यांचे आयडी आणि अपॉईंटमेंट लेटरही दाखवण्याचं बजावलं. या घटनेचा व्हिडिओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला. औसा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत असून या सभेसाठी उद्धव ठाकरे औसा मतदारसंघातील नियोजित हेलिपॅडवर आले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासणी केली. विशेष म्हणजे काल सोमवारीच त्यांची बॅग तपासल्याने मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यभरातून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संतापले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी महाविकास आघाडीच्या सभेला जातानाही उद्धव ठाकरेंनी सुरक्षा रक्षकांना सुनावलं होतं.
दरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, औसा येथील मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अभिमन्यू पवार आहेत. त्यांच्याविरुद्ध ठाकरेंचे दिनकर माने मैदानात आहेत.