मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने आज #PowerOf18 मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून तरुणाईला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर ट्विटर भर देणार आहे.


#PowerOf18 मोहिमेअंतर्गत नव्याने मतदार होणाऱ्या तरुणाईला निवडणुकांबद्दल माहिती देणे, तसंच मतदानाच्या सामाजिक जाणिवेबद्दल जागृत करण्याचा प्रयत्नही ट्विटरकडून केला जाणार आहे. यासाठी ट्विटरने #PowerOf18 हा हॅशटॅगही बनवला आहे.

ट्विटरची ही मोहीम सीईओ जॅक डोरसी आणि माया हरी यांनी लॉन्च केली आहे. आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत विशेष चर्चासत्रही घेण्यात आलं.

आम्ही भारतात #PowerOf18 मोहीम लॉन्च करत आहोत. या मोहिमेच्या माध्यमातून भारतातील तरुणाईला बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. ज्यामुळे नवीन मतदान करणारी तरुणाई आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पुढे येईल, अशी आम्हाला आशा आहे. मोहिमेच्या लॉन्चिंगवेळी माया हरी यांनी हे स्पष्ट केलं आहे.

ट्विटरने आगामी निवडणुकांसाठी एक सर्व्हेही घेतला ज्यात 3622 तरुणांची मतं नोंदवण्यात आली. यात 94 टक्के तरुणांनी आगामी निवडणुकीत मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.