हैदराबाद : सलामीच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोच्या दमदार शतकांमुळे हैदराबादनं बंगलोरसमोर 231 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं चौकार षटकारांची आतषबाजी करत वैयक्तिक शतकं झळकावली.


बेअरस्टोनं 56 चेंडूत 114 धावा फटकावल्या. तर वॉर्नरनं 55 चेंडूत नाबाद 100 धावा कुटल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 185 धावांची विक्रमी भागीदारी रचली. वॉर्नर आणि बेअरस्टोनं रचलेली आयपीएलमधली ही सलग तिसरी शतकी भागीदारी ठरलेली.

हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनं बंगलोरविरुद्ध झळकावलेलं शतक त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं चौथं शतक ठरलं. वॉर्नरनं अवघ्या 55 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोनंही आयपीएलमधलं पहिलं शतक झळकावलं. त्यानं 56 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि सात षटकारांसह 114 धावा कुटल्या.