Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कोणाची डोकेदुखी वाढवणार? अशी चर्चा महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये रंगली असताना भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana In Kolhapur) यांच्यासह महायुतीमधील महिला नेत्या मेघाराणी जाधव यांनीही लाडक्या बहिणींना धमकावल्याने स्पर्धाच लागली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा धमकीवजा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच हातकणंगलेमधील महायुती पुरस्कृत उमेदवार अशोकराव माने यांच्या सूनबाई आणि जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष निता दांडेकर-माने यांनी 500 रुपयांत महिन्याला घर चालते, कुठ महागाई आहे, असे बौद्धिक क्लास घेतला.
पहिल्यांदा आक्रमक शैलीमध्ये धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकी दिल्यानंतर नंतर या प्रकरणावर पहिल्यांदा माफी मागण्याऐवजी लव्ह जिहाद होऊ नये म्हणून म्हणून बोललो अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सोशल मीडियामधून व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताच तसेच विरोधी पक्षांकडून सडकून टीका होताच भाजप खासदार धनंजय महाडिक नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये माफीनामा सादर केला आणि माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली. मात्र तोपर्यंत पुलाकडून बरेच पाणी वाहून गेलं होतं. यानंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून सातत्याने धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा दाखला दिला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने तोफ डागली आहे.
महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार
हा वाद वाढला असतानाच भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवडेमध्ये आयोजित सभेत भाजपच्या महिला पदाधिकारी मेघारानी जाधव बोलत होत्या.
महागाई वाढली असली तरी महिन्याला खच्चून 500 रुपयेच्या वर खर्च जाणार नाही
हा वाद वाढला असतानाच जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष निता दांडेकर-माने यांनी तर 1500 रुपये कोणत्या पद्धतीने खर्च करावेत, याचा बौद्धिक क्लास घेतला. त्या म्हणतात, तेलाचा डबा 1500 चा 2200 केला म्हणायला कोण बाई महिन्याला डबा संपवते? चार माणसांना महिन्याला खच्चून दीड किलो तेल लागतं. महागाई वाढून वाढून किती वाढली?भाजीपाल्याची नासाडी झाल्याने भाजीपाला महाग झाला आहे. महागाई वाढली असली तरी महिन्याला खच्चून 500 रुपयेच्या वर खर्च जाणार नाही. आणि महागाई वाढली तरी खर्चाला भावांनी हजार रुपये दिले आहेत 1500 मधील 500 गेले तरी 1 हजार रुपये राहणार आहेतच की ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या