Ajit Pawar on Jayant Patil : लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर धमक आणि ताकद लागते. 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. परंतु, साधं एमआयडीसी उभारण्याचं काम झालं नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल केला. कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? असा टोला जयंत पाटील यांना लगावला. 


कारखाने हाणण्याचे काम जयंत पाटील करतात 


अजित पवार म्हणाले की, पहिल्यांदा लोकांच्या समस्येवर, शेतकऱ्यांना पैसा द्या, मग मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा मारा. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे हाणले, दुसऱ्या ठिकाणी काढलेले कारखाने हाणण्याचे काम जयंत पाटील करतात. लोकांना पिण्याचे पाणी देत नाहीत, त्यांच्या अंगातच पाणी नाही तर लोकांना पाणी कुठून देणार? अशी टीका त्यांनी केली. नेतृत्व विकास करणारे लागतं, नुसतं काय सांगता, काय बोलता, असं बोलून होत नाही. अरे काय सांगता, काय सांगता. मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही मग काय सांगू?  


यांच्या बापाने दिलं होतं का? 


अजित पवार यांनी सांगितले की, 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचा संरक्षण यांच्या बापाने दिलं होतं का? आम्ही दीड हजार दिल्यावर ते 3 हजार द्यायला निघाले मग तुमचं सरकार होतं तेव्हा झोपा काढत होता का? देशाचे विरोधी पक्षनेते खटाखट पैसे देतो असे सांगतात, देशाचे विरोधी पक्ष नेते उल्लू बनवत आहेत, पण आम्ही काही गोट्या खेळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून जे नेते सांगत आहेत घड्याळाचे बटन दाबा, मी देखील तेच सांगतोय, मी काही वेगळं सांगत नाही.  


गलिच्छ राजकारण इस्लामपूरमधील नेतृत्वाने केले


मी मुस्लिम समाजाला देखील बरोबर घेऊन जात काम करतो. मुस्लिम समाज देखील महत्त्वाचा आहे, त्या समाजाला देखील संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर आमदार केले. अगदी गलिच्छ राजकारण इस्लामपूरमधील नेतृत्वाने केले आहे. निवडणुकीपुरतं आमचं राजकारण असतं, निवडून आल्यावर आम्ही राज्याची कामे करण्यासाठी बसतो. 


तर लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर?


जयंत पाटलांच्या गावातील पोलीस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे. जयंत पाटलांना त्यांच्या गावातील पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला. उमेदवारांना उभ करायचं आणि तिथं मॅच फिक्सिंग करून मिली भगत करून उमेदवार पाडायचं हे राजकारण जयंत पाटलांचं आहे. नेताच काट्याने काटा काढायला लागला तर लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? अशी टीकाही त्यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या