मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे.


दुसरीकडे काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनीही साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. भोपाळच्या भाजप उमेदवार 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. खटला अजून प्रलंबित आहेत. भाजप धर्माच्या आधारावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तहसीन पूनावाला यांनी केली आहे.

भाजपने काल (17 एप्रिल) जाहीर केलेल्या 22 उमेदवारांच्या यादीत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे.

भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. तसंच इतर आरोपींसह साध्वी प्रज्ञा सिंहला मुंबईतील एनआयए कोर्टात सुनावणीसाठी नियमित हजेरी लावण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी नासिर बिलाल यांच्या याचिकेत करण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने बुधवारी (16 एप्रिल) भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काल (17 एप्रिल) त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भोपाळ मतदारसंघात भाजप गेल्या 30 वर्षापासून अजिंक्य आहे.

भोपाळमध्ये काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांचं नाव समोर आल्यानंतर भाजप प्रज्ञा सिंह ठाकूरच्या नावाचा विचार करत होती. तर संधी मिळाली तर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढण्याची तयारी प्रज्ञा सिंह ठाकूरनेही दर्शवली होती. दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना साध्वी प्रज्ञा सिंहने त्यांना देशद्रोही देखील म्हटलं होतं.