मुंबई : तेलंगणातून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून ओवेसी यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवली आहे. अकबरुद्दीन हे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू आहेत.

भाजपने मुस्लिम कार्ड खेळत ओवेसींसमोर शहजादी सय्यद यांचं आव्हान ठेवलं होतं. तर टीआरएसच्या सीता रेड्डी यांचीही त्यांना टक्कर होती.

चंद्रयान गुट्टा हा मतदारसंघ हैदराबाद लोकसभा क्षेत्रात येतो. पूर्वी हा मतदारसंघ आंध्र प्रदेशात होता, मात्र विभाजनानंतर तेलंगणाचा भाग झाला.

2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ओवेसींनीही जागा 59 हजार 274 च्या मताधिक्याने जिंकली होती. यापूर्वी चार वेळा (1999,2004,2009 आणि 2014) अकबरुद्दीन ओवेसी या मतदारसंघातून विजयी झाले होते. ओवेसी बंधू प्रक्षोभक भाषणांमुळे चर्चेत असतात.

तेलंगणात एमआयएमचे उमेदवार अनेक जागांवर आघाडीवर आहेत. मात्र संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर तेलंगणा विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये टीआरएसने आघाडी घेतली असून काँग्रेस-टीडीपी आघाडीही चमक दाखवत आहे. मात्र भाजपचा तेलंगणात सुपडासाफ झाल्याचं चित्र आहे.

दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून बहुमतासाठी 60 जागा आवश्यक आहेत. सत्ताधाऱ्यांनी पाच महिने आधीच विधानसभा भंग केल्यानंतर 7 डिसेंबरला निवडणुका झाल्या होत्या.