रायपूर :  लोकसभेच्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे.  गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार 90 जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 66 तर भाजपा 14 जागांवर आघाडीवर आहे.  माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगडने 9 जागांवर आघाडी मिळवली होती.

गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला काँग्रेसने चांगलेच आव्हान दिले आहे. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंह यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. मात्र ही ताकद अपुरी पडल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील जनमानसात आमची प्रतिमा चांगली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल. छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे, असा दावा निकालापूर्वी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी केला होता, मात्र हा दावा खोटा ठरताना दिसून येत आहे.

90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला 39 जागा तर बसपाला एका जागेवर विजय मिळवता आला होता. गेल्या 15 वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या वेळी भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 तर बसपला चार टक्के मते मिळाली होती.

15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला नवा पक्ष  (जनता काँग्रेस छत्तीसगड ) निर्माण करत ही निवडणूक रोमांचक बनवली.

Election Result Live Update


 - छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ, काँग्रेस तब्बल  66 जागांवर आघाडीवर, भाजप ऑफिसमध्ये सन्नाटा  

-रमणसिंह सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर, माजी मुख्यमंत्री अजित जोगींची मोठ्या विजयाकडे वाटचाल 

- काँग्रेस 63, भाजप 18,  इतर 09  जागांवर आघाडीवर 

- दुप्पट जागांवर काँग्रेसची आघाडी 

- रमणसिंहांची सत्ता जाण्याची शक्यता, काँग्रेसला मोठी आघाडी


- काँग्रेस 46, भाजप 24, जनता काँग्रेस छत्तीसगड 8, तर इतर 10 जागांवर आघाडीवर 

- काँग्रेस 60, भाजप 24,  इतर 6 जागांवर आघाडीवर 


- काँग्रेस 56, भाजप 28 तर इतर 6 जागांवर आघाडीवर 

- काँग्रेस 54, भाजप 30 तर इतर 6 जागांवर आघाडीवर 

- काँग्रेस 48, भाजप 32 तर इतर 7 जागांवर आघाडीवर 

- मुख्यमंत्री रमणसिंह राजनांदगाव मतदारसंघातून पिछाडीवर 

- छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर, काँग्रेस 36 , भाजप 30 तर इतर 6 जागांवर आघाडीवर 


छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील महत्वाच्या गोष्टी


- 90 आमदार असलेल्या छत्तीसगड विधानसभेत बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे.


-  छत्तीसगडमध्ये मागील 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री रमणसिंह 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत.


- छत्तीसगडमध्ये आतापर्यंत चार वेळा निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपने सलग 3  वेळा विजय प्राप्त केला आहे.


- राज्यात 1.85 कोटी मतदारांनी 1,269 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद केले आहे.


- यावेळेस छत्तीसगडमध्ये 76.35 टक्के मतदान झाले आहे.  2013 च्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झाले आहे.


- छत्तीसगडचा गड सर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 19, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 12 तर उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 सभा घेतल्या होत्या.


- छत्तीसगडची ही निवडणूक वादग्रस्त वक्तव्यांनी देखील गाजली.