सांगली : राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होणार असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांनी भाजपच्या संजयकाका पाटील यांना पक्षात घेऊन तिकिट दिलं.  रोहित पाटील यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारी आणि लोकसभेत पराभूत झालेल्या भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकारणाची  अस्तित्वाची ही लढाई असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. 


शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली


आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा आमदार राहिल्या. त्यांच्या मुलाने म्हणजे रोहित पाटलांनी वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली. स्वतः शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पाठबळ कसे मिळेल यासाठी लक्ष घातल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे कवठेमहांकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनी संजयकाकाना पाठिंबा दिला आहे. 


सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आर आर पाटलांनी झेडपी ते आमदार आणि नंतर मंत्री अशी झेप घेतली. त्यांचाच वारसा आता रोहित पाटील चालवत असून त्यांचीही नाळ सर्वसामान्यांसोबत जुळल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधक संजयकाका पाटील हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यामागे भाजपची ताकद, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद उभी आहे. 


तासगावातील महत्त्वाचे प्रश्न


दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तासगाव मतदारसंघामध्ये म्हैशाळ टेंभू पाणी योजना ही महत्त्वाची योजना आहे. आता त्यावरून श्रेयवाद सुरू असल्याचं दिसून येतंय. तर द्राक्षे उत्पादक शेतकरी आणि त्यांचे प्रश्नही या मतदारसंघामध्ये महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. 


सांगलीतील इतर भागांची तुलना करता विकासाच्या बाबतीत तासगाव काहीसा मागे पडल्याचं दिसतंय. या ठिकाणी मोठ्या उद्योगांचा अभाव आहे. कागदोपत्री तासगावमध्ये एमआयडीसी मंजूर झाली आहे. रोहित पाटलांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसी तर मंजूर झाली. पण त्यासाठी निधीच दिला नसल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. 


या सर्व गोष्टींचा विचार करता तासगावकरांच्या मताचं दान रोहित पाटील की संजयकाका पाटलांच्या झोळीत पडणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. 


ही बातमी वाचा :