मुंबई : अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिल्याची माहिती मिळत आहे.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तर औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगरची जागा सोडण्यास मात्र तयार नाही.

दुसरीकडे सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन अहमदनगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली होती. परंतु सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादीमध्ये जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर या जागांची अदलाबदल करुन या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे.

मुलासाठी राधाकृष्ण विखे पाटलांचा आग्रह

अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेससाठी ही जागा सोडली नसल्याचं सांगत या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.



भाजप प्रवेशाची चर्चा, विखे पाटलांचं उत्तर

तसंच सुजय पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती. यावर सुजय भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, पण राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णतः त्यांनाच आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटलांनी एकप्रकारे सुजय यांच्या पक्षांतराचे संकेत दिले होते.

संबंधित बातम्या

सुजय विखे-पाटील भाजपच्या मार्गावर? राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात...

सुजय विखे पाटील-रोहित पवार एकत्र, राजकीय वैर संपवून तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय?

अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध

राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव भाजपात प्रवेश करणार?

राधाकृष्ण विखे पाटील नाराज, महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्याकडेही पाठ