मुंबई/कोल्हापूर : महाआघाडीच्या ऑफरमुळे नाराज असलेला राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. 27 फेब्रुवारीला माढ्यात स्वाभिमानीने एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारीला पुण्यात कार्यकारिणी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाचा नारा देईल, अशीही चर्चा आहे. शिवाय याच मेळाव्यात स्वाभिमानी आपला उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे.


यासंदर्भात कोल्हापूरमध्ये रात्री 12 वाजता सुरु झालेली बैठक पहाटे पाच वाजेपर्यंत चालली. या बैठकीत स्वबळाचा नारा देण्याबाबत निर्णय झाला.

महाआघाडीने स्वाभिमानीला हातकणंगले या एकाच जागेची ऑफर दिली होती. परंतु राजू शेट्टी तीन जागांच्या मागणीवर ठाम आहेत. यामध्ये वर्धा आणि बुलडाण्याच्या जागेचा समावेश आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण नऊ ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या जागांचा समावेश आहे.