सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी सांगली लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेसला अलटीमेटम दिला आहे. सांगलीच्या जागेबाबत उद्यापर्यंत जो निर्णय घ्यायचा तो घ्या, अन्यथा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी एकाकी लढणार असून स्वाभिमानीकडे तीन सक्षम उमेदवार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

आम्ही योग्यवेळी ते उमेदवारी जाहीर करू. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कॉंग्रेसने बुलढाणा आणि शिर्डीची जागा बदलून द्यावी. मात्र वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका, असे म्हणत खासदार राजू शेट्टीनी काँग्रेस हायकमंडकडे हा तिढा उद्यापर्यत सोडवण्याची विनंती केली आहे.

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर सगळे वाद संपवून आम्हाला द्यावी. एक मत होऊन निवडणूक लढवायची आहे. कारण आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे. एकमत करा अन्यथा शिर्डी द्या, अशीही मागणी त्यांनी केली.

वसंतदादांचा परिवार हा स्वाभिमानीचा परिवार आहे. गेल्या पाच वर्षात वसंतदादा परिवाराच्या लोकांना दिल्लीत मदत केली. स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यावर अन्याय केला. असे दर्शवले जात आहे. तसे काहीही नाही. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत, असं देखील ते म्हणाले.

विनाकारण स्वाभिमानीला पिंजऱ्यात उभे केले जात आहे. वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे योगदान दिले त्याची आम्हाला जाणीव आहे. स्वाभिमानीमुळे वसंतदादा गटावर अन्याय हे मनाला लागले. प्रतीक पाटील यांना स्वाभिमानीमधून लढण्याची ऑफर दिली होती , असा खुलासाही शेट्टीनी केला.