मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 मार्चनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितलं आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीतील घटक पक्षांच्या जागांचा तिढा सोडवण्यात अपयशी ठरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या तीन जागांची मागणी केली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनेही काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडे 22 जागांची मागणी केली आहे.
तीन जागांची मागणी असताना स्वाभिमानी पक्षाला हातकणंगलेतील एक जागा देण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटनांने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय दोन दिवसात जागा वाटपासंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
हातकणंगले, वर्धा, बुलढाणा या तीन जागांची मागणी आम्ही केली आहे. मात्र महाआघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी गंभीर नसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. आचारसंहितेची तारीख जवळ येत असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीकडून जागावाटपाचं घोंगडं भिजत ठेवलेलं आहे.
भाजप सरकारविरोधात मोठी आघाडी निर्माण व्हावी, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. म्हणून महाआघाडीत यायला आम्ही तयार झालो. परंतु सत्ता परिवर्तानाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते गंभीर नसल्याचं प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले.
दोन दिवसात जागावाटपाचा तिढा सोडवा, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु : स्वाभिमानी संघटना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Mar 2019 09:17 AM (IST)
तीन जागांची मागणी असताना स्वाभिमानी पक्षाला हातकणंगलेतील एक जागा देण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटनांने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय दोन दिवसात जागा वाटपासंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -