मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून (BVA) करण्यात आला. यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
विनोद तावडे नालासोपाऱ्यात विवांत हॉटेलमध्ये त्यांचे उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी आले होते. दोन्ही नेते हॉटेलमध्ये बसलेले असतानाच अचानक बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह विवांत हॉटेलमध्ये आले. विनोद तावडे पैसे वाटपासाठी बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. यावेळी क्षितीज ठाकूर यांनी पैशांचं बंडल देखील माध्यमांना दाखवले.
सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यानंतर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?' असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
विनोद तावडेंची प्रतिक्रिया
या प्रकरणावर विनोद तावडे म्हणाले की, आज नालासोपारामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. यावेळी आमचे विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला की मी पैसे वाटत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नक्कीच चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही चेक करावे, त्यातून सत्य बाहेर येईल. मी 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षात आहेत. हितेंद्र ठाकूर मला चांगले ओळखतात. सत्य सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा