Vinod Tawade Hitendra Thakur Virar: विरार-नालासोपारामध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात वाद झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विवांत हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यानंतर बविआकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला.
विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया-
सदर सर्वप्रकरणावर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला, की मी पैसे आणले. त्यांनी सगळं तपासलं पण काहीच पैसे मिळाले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी सांगितले.
मला भाजपवाल्यांनीच सांगितलं- हितेंद्र ठाकूर
विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं. मला वाटलं विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असं छोटं काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असं का केलं, हे त्यांनाच विचारा...सीसीटीव्ही बंद केला, त्यामुळे हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.
विनोद तावडेंनी मला 25 फोन केले- हितेंद्र ठाकूर
5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचे आरोप, राड्याचा UNCUT VIDEO:
संबंधित बातमी: