Supriya Sule on Dhananjay Mahadik : "लाडकी बहीणचे 1500 रुपये घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो", असं वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. दरम्यान, आता त्यांनी माफी मागितली असून माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते, असे स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार भाजपाचा लोकशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे. भाजपा नेत्याचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील आहे. कोणत्या पक्षाच्या रॅलीत नागरीकांनी सहभागी व्हायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी कुणीही कुणावर दबाव टाकू शकत नाही. निवडणूक आयोगाने या वक्तव्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी.
विजय वडेट्टीवार काय काय म्हणाले?
लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश! काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त 1500 रुपये? लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली! सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे.
सतेज पाटील काय म्हणाले?
सतेज पाटील म्हणाले, आपण केलेली चूक चूक नाही म्हणायला देखील धाडस लागते. ते धाडस धनंजय महाडिक यांनी दाखवले. त्यांनी घेतलेला यू टर्न आहे पण आता गोल झाला आहे. राज्यातील संपूर्ण महिला याचा समाचार घेतील. भाजपचे नेते वेळोवेळी महिलांचा अपमान करत आहेत. राज्यातील महिला महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहतील.
धनंजय महाडिक म्हणाले, माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडनाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या