पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओलला तिकीट देण्याची भाजपची तयारी आहे. निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वत: फारसा उत्सुक नाही. त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहेत.
सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल.
गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. 1997,1999, 2004 आणि 2014 मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल.
62 वर्षांचा सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून मुलगा करण देओलला लाँच करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे त्याचं प्रदर्शनही वारंवार लांबणीवर पडत होतं. भाईजी सुपरहिट, यमला पगला दिवाना, पोस्टर बॉईज, घायल वन्स अगेन हे त्याचे नजीकच्या काळातले चित्रपट.
सनीने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वर्दी, त्रिदेव, चालबाज, निगाहे यासारख्या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन भूमिका अधिक गाजल्या. 1990 साली राजकुमार संतोषींच्या 'घायल' चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर दामिनी, डर, घातक, बॉर्डर, गदर एक प्रेमकथा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.