अमृतसर : भाजप उमेदवार, अभिनेता सनी देओल सोमवारी एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. अमृतसर-गुरदासपूर राष्ट्रीय राज्यमार्गावरुन प्रवासादरम्यान गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल आपल्या ताफ्यासह या मार्गावरून रोड शोसाठी जात होता. दरम्यान सनीच्या गाडीचा टायर फुटल्याने ताफ्यातील कमीत कमी चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र काही वेळ घटनास्थळी गोंधळ उडाला होता. अपघातानंतर सनी देओल दुसऱ्या वाहनाने पुढील दौऱ्यासाठी निघाला.
सनी देओलने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सनीला भाजपने पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सनी देओलचा सामना काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील जाखड यांच्याशी होणार आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना या जागेवर भाजपकडून चार वेळा खासदार राहिले होते. मात्र एप्रिल 2017 मध्ये त्यांचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर ही जागा भाजपच्या हातून निसटली.
सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती
पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात सनी देओलने त्याची मालमत्ता जाहीर केली आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्याच्या बँक खात्यात 35 लाख रुपयांची रोकड आहे. सनीची पत्नी पूजा देओल यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 19 लाख आणि 16 लाख रुपयांची रोकड आहे.
पंजाबमध्ये 19 मे रोजी मतदान
पंजाबमधील लोकसभेच्या सर्व 13 जागांवार शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता पंजाबवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजप पंजाबमध्ये मित्रपक्ष अकाली दलसोबत मिळून प्रचार करत आहे.
आणखी वाचा
- सनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल, सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती
- सनी देओलला भेटल्यावर नरेंद्र मोदींना 'त्या' गाजलेल्या डायलॉगची आठवण झाली
- सनी देओल चित्रपटातला तर मी खरोखरचा फौजी : मुख्यमंत्री अमरिंदर सिंह
VIDEO | रोड शो दरम्यान सनी देओलला महिलेचं किस