पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरुन तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हॉटेलचा पत्ता माहित असूनही तो न सांगितल्यामुळे कारमधून आलेल्या तिघांनी तरुणावर गोळीबार केला. सनी चौधरी असं जखमी तरुणाचं नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्याच्या फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अहमदनगरमधून आलेल्या तिघांनी सनी चौधरीला 'हॉटेल प्यासा'चा पत्ता विचारला. मात्र सुरुवातीला त्याने पत्ता माहित नसल्याचं सांगितलं. मग तुला इच्छितस्थळी सोडतो, असं सांगितल्यावर सनीने हॉटेलचा पत्ता सांगितला. परंतु पत्ता माहित असूनही पहिल्यांदा विचारल्यावर का सांगितला नाही, याचा राग आरोपींच्या मनात होता. गाडीत बसल्यावर आरोपींनी त्याला दमदाटी केली आणि नंतर त्याच्या पायावर छर्र्यांच्या बंदुकीने गोळीबार केला. यात सनी चौधरी गंभीर जखमी झाला आहे. तर आरोपी तिथून पसार झाले.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये घटनेतील कारचा नंबर मिळाला. त्यानुसार पोलिसांनी
अंबादास होंडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. आरोपी पुण्याबाहेरच्या असून, त्यांचा माग काढण्याचे काम सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
पुण्यात हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने तरुणावर गोळीबार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2019 01:36 PM (IST)
पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीत तलवारीच्या धाकावर चार फ्लॅट्स लुटल्याची घटना घडली होता. आता तरुणावर बंदुकीने गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -