नाशिक : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द विखे-पाटलांनी या चर्चेविषयी भाष्य केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतला नगरच्या जागेचा तिढा न सुटल्यास सुजय यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे.

अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा दावा नवीन नाही. मात्र तीन वेळा राष्ट्रवादी नगरमध्ये पराभूत झाल्यामुळे ती जागा मिळावी, यासाठी आम्ही आग्रही असल्याचं विखे-पाटील म्हणाले. चर्चेतून विषय सोडवावा, हा प्रतिष्ठेचा मुद्दा करुन फायदा नाही, असंही ते म्हणाले.

सुजय भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, पण राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णतः त्यांनाच आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटलांनी एकप्रकारे सुजय यांच्या पक्षांतराचे संकेत दिले आहेत. सांगलीची जागा मागितली नसल्याचंही स्पष्टीकरण विखेंनी दिलं.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणखी एका जागेची मागणी केली आहे. 'तुमची संघाबाबत भूमिका काय?' अशी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शेवटची मागणी समोर आली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत महाआघाडीचा अंतिम निर्णय समोर येईल, अशी माहिती विखेंनी दिली.

दरम्यान, अहमदनगरमधून राष्ट्रवादीच लढणार असून ही जागा काँग्रेससाठी सोडली नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडल्याचं शरद पवार यांनी कधीच म्हटलं नसल्याचंही अजित पवार म्हणाले.