मुंबई : बहुप्रतिक्षीत वडाळा ते सातरस्ता या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 12 किलोमीटरच्या मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु करण्यात आला. वडाळा डेपो येथे मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.


मोनोचा पहिला 9 किमीचा स्ट्रेच केवळ जॉयराईड होता. ती सिस्टीम केवळ पाहण्याकरता होती. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील मोनोमुळे मोनो खऱ्या अर्थानं लोकोपयोगी होणार आहे. मोनोतील प्रवासी संख्या नक्की वाढेल मोनोचा तोटाही भरुन निघेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. लवकरच इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली सुरू केली जाईल. ज्याद्वारे एका तिकिटावर रेल्वे, मोनो, मेट्रो आणि बेस्ट बसचा प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.


दुसऱ्या टप्प्यातील स्थानके


वडाळा ते सातरस्ता असा 12 किमीचा मोनोरेल्वेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या मार्गावर संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर ही स्टेशन्स असणार आहेत.


पहिला टप्पा तोट्यात


फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला होता. मात्र, मोनोरेल्वेच्या या पहिल्या टप्प्यातच मोनोरेल्वे फेल गेली. पहिल्या टप्प्यातील स्थानके ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही.


मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू आहे. मोनोला दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम 15 हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर, दिवसाला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो.


दुसऱ्या टप्प्यातही मोनोला थंड प्रतिसाद मिळणार?


दुसऱ्या टप्प्यातील मोनोकडून खूप अपेक्षा असली तरी दुसऱ्या टप्प्यातील मोनोकडूनही अपेक्षाभंग होऊ शकतो. कारण चेंबूर ते सातरस्त्याच्या मोनोच्या दोन्ही टप्प्यांवर मिळून केवळ चारच मोनो रेल्वे चालणार आहेत. मोनो रेल्वेची संख्या कमी असल्यानं एक मोनो गेल्यानंतर दुसरी मोनो येण्यास तब्बल 22 मिनिट वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे, मोनो सुरु झाली तरी प्रवासी मिळणार का हा प्रश्न आहे.