सोलापूर : सोलापुरातील अनेक प्रमुख उमेदवारांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  सर्व उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये आपल्या मालमत्तेसंदर्भातील माहिती देखील उमेदवारांनी जाहीर केली आहे. राज्याचे सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांच्या उत्पन्नात या पाच वर्षात तब्बल 2 कोटी 14 लाख रुपयांची घट झाली आहे. तर सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उत्पन्नात देखील घट झालेली पाहायला मिळत आहे. तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संपत्तीत मात्र वाढ झालेली आहे.


सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 2015 साली आपल्या आयकाराच्या विवरणपत्रात सुमारे 2 कोटी 73 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन असल्याचे सांगितले होते तर 2019 साली त्यांनी भरलेल्या विवरणपत्रात सुमारे 2 कोटी 14 लाख रुपयांची घट होऊन 23 लाख 73 हजार इतके झाले आहे. सुभाष देशमुख यांच्या ज्या बंगल्याची सर्वात जास्त चर्चा झाली त्याची किंमत जवळपास 9 कोटी 13 लाख रुपये आहे. सुभाष देशमुख यांच्या कुटुंबाकडे एकूण 48 कोटी 45 लाखांची मालमत्ता आहे. यामध्ये 20 कोटी 8 लाख रुपयांची जंगम तर 28 कोटी 37 लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचं सहकारमंत्र्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सुभाष देशमुख यांच्याकडे एक किलोपेक्षा अधिकचे सोने आहे.  देशमुख कुटुंबाची मालमत्ता कोट्यवधीत असली तर त्यांच्यावर कर्ज देखील कोट्यवधींची आहेत. कुटुंबातील सर्व कर्ज मिळून जवळपास 17 कोटी 51 लाख रुपयांचे देणे आहे. यामध्ये विशेष म्हणजे सहकारमंत्र्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही. सहकारमंत्र्यांच्या पत्नीकडे मात्र 4 ट्रॅक्टर आहेत.

तर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उत्पन्नात ही गेल्या पाच वर्षात घट झाली आहे. 2015 साली प्रणिती शिंदे यांचे उत्पन्न 64 लाख  46 हजार 260 रुपये इतके होते मात्र 2019 साली त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. यंदाच्या वर्षी 29 लाख 80 हजार 820 रुपयांचे वार्षिक उत्पन्न असल्याचे प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. त्यांच्याजवळ 1 कोटी 39 लाख 62 हजार 532 रुपयांची जंगम तर 3 कोटी 39 लाख 64 हजार 678 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रणिती शिंदे यांच्यावर कोणत्याही प्रकरचे कर्ज देखील नाही. प्रणिती शिंदे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातीन पदवीचं शिक्षण घेतलेल्या प्रणिती शिंदे यांच्यावर 5 गुन्हे देखील दाखल आहेत. यंदाच्या निवडणुकात दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याचा देखील यात समावेश आहे.

सोलापूर शहर उत्तरचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या प्रतिज्ञापत्रात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उत्पन्नात वाढ झाल्याचं सांगितलं आहे. 2014 साली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचं उत्पन्न 15 लाख 77 हजार 200 रुपये इतकं होतं तर 2019 साली त्यांनी आपले उत्पन्न 29 लाख 84 हजार 362 रुपये असल्याचं म्हटलं आहे. 2014 साली विजयकुमार देशमुख यांच्यावर जवळपास 44 लाख 59 हजार 141 रुपयांचे कर्ज देखील होते मात्र 2019 साली त्यांनी या सर्व कर्जांची परतफेड केलीय. विजयकुमार देशमुख यांच्याकडे 14 कोटी 13 लाख 53 हजार 348 रुपयांची एकूण संपत्ती आहे. ज्यामध्ये 24 लाख 68 हजार 565 रुपयांची जंगम तर 13 कोटी 88 लाख 84 हजार 783 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विजयकुमार देशमुख यांच्याकडे सुमारे 100 ग्राम सोने असुन त्यांच्यावर 2014 साली 3 गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

सोलापुरात कामगार नेते अशी ओळख असलेल्या नरसय्या आडम यांच्या उत्पन्नात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. 2014 साली आडम यांनी 5 लाख 95 हजार 500 रुपये इतके वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगितले होते मात्र गत पाच वर्षात त्यांचे उत्पन्न 2 लाख 4 हजार 500 रुपयांनी वाढले आहे. यंदाच्या वर्षी कॉम्रेड नरसय्या आडम यांच्याकडे 8 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न आहे. नरसय्या आडम यांच्या एकूण मालमत्तेत 17 लाख 98 हजार 211 रुपयांची जंगम आणि 17 लाख 24 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. नरसय्या आडम यांच्यावर प्रलंबित खटल्यांची संख्या मात्र 15 आहे.