मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीची नवी तारीख समोर येताच भाजपकडून शपथविधीची जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. सध्या महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मंत्रिपदांची वाटाघाटी होत आहे. तर महायुती सरकारचा हा शपथविधी भव्य स्वरुपाचा असणार आहे. भाजप पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंकडून बैठकांचं सत्रही सुरू झालं. महायुतीचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.
भाजपच्या सुमारे 15 हजार प्रमुख पदाधिकार्यांनी आमंत्रण
दरम्यान, शपथग्रहण समारोहासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना खास सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपचे सुमारे 15 हजार पदाधिकारी शपथ ग्रहण सोहळ्यात उपस्थित राहतील. अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ही पदाधिकाऱ्यांसाठीचा कोटा ठरला असण्याची शक्यता आहे. पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असून मुख्यमंत्री भाजपचा राहील हे स्पष्ट झाल्यानंतर आता शपथविधी समारोहाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, या दाट शक्यतेमुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे.
मात्र, आझाद मैदानाची क्षमता 30 ते 35 हजार इतकी पाहता आणि तीन प्रमुख पक्षांचा सरकार असल्याने तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने शपथ ग्रहण सोहळ्यात येण्यास इच्छुक असल्याने भाजपच्या सुमारे 15 हजार प्रमुख पदाधिकार्यांनी शपथग्रहण सोहळ्यात यावं, अशी अपेक्षा प्रदेश भाजप ने व्यक्त केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावे निश्चित करावी, अशी सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला
महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा