Sanjay Raut on Eknath Shinde  : न्यायमूर्ती चंद्रचूड (D. Y. Chandrachud) हे घटनाबाह्य पद्धतीने काम करत आहेत. तसेच राज्याचे काळजी वाहू सरकार हे देखील घटनाबाह्य आहे. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपली आहे. 26 तारखेला नवीन विधानसभा तसेच नवीन सरकार अस्तित्वात येणं हे घटनेनुसार अत्यावश्यक होतं. मात्र सरकारचे भाडोत्री कायदेपंडि‍त आता काहीही कागद आणून दाखवातील. पण त्या जागी आम्ही असतो तर एव्हाना आम्ही राष्ट्रपती राजवट लावली असती. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती (Mahayuti) आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे.


चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का? 


अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून आज जवळजवळ दहा दिवस उलटून गेले आहेत. तसं बघायला गेलं तर एवढे बहुमत असताना 24 तासात सरकार स्थापने संदर्भात दावा करायचा होता. मात्र अद्याप कुणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण? राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत तरी विधिमंडळाचा नेता यातून हे ठरवू शकले नाही. सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांना देखील अद्याप कोणीही भेटले नाही. असे असताना राज्यपाल हे खुशाल चालू देत आहे. किंबहुना या प्रांताचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगतात आम्ही पाच तारखेला शपथविधी घेऊ, हे सांगायला ते राज्यपाल आहेत का? त्यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. 


सरकार स्थापनेचा दावा करायला देखील अद्याप कुणीही तयार नाही. हे नेमकं कुणाला घाबरत आहेत, कशाकरता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये. ही अतिशय गंभीर बाब आहे. या एकंदरीत सर्व परिस्थितीला न्यायमूर्ती चंद्रचूड हेच जबाबदार आहे. असेही संजय राऊत म्हणाले.


काळजी वाहू मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांची गरज आहे की एखाद्या मांत्रिकाची?


राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याविषयी काही वेळ वाकडं म्हणू नका. यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्यांनाही ते भेटले नाहीत, किती अस्वस्थ आहेत हे बघा. पाच तारखेला ते शपथविधीच्या कार्यक्रमाला येत आहेत का? की एअर ॲम्बुलन्स मधून त्यांना यावं लागेल? अनेक डॉक्टर त्यांच्याकडे गेले असे मी वृत्तपत्रातून ऐकले. मात्र त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे की एखाद्या मांत्रिकाची गरज आहे, हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की पंतप्रधान मोदी पाठवत आहेत, हे बघावं लागेल. त्यांच्या अंगात जी भुता संचारली आहे ती उतरावली पाहिजेत आणि बहुदा हे काम देवेंद्र फडणवीस हे करत असतील तर ही आनंदाची गोष्ट असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.


हे ही वाचा