सोलापूर हा कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. पूर्वी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दक्षिण सोलापुरातील 90 गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 27 गावांचा समावेश होता. मात्र 2009 मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि विधानसभेचे दोन तुकडे झाले. तळवळ भागातील 27 गावे आणि कुंभारी, वळसंग, बोरामणी भागातील 36 गावे अक्कलकोट विधानसभेला जोडली गेली. तर मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, हत्तुर, आहेरवाडी या भागातील 56 गावे तसेच उत्तर तालुक्यातील 10 गावे आणि सोलापूर शहरातील 12 प्रभागांचा मिळून 'सोलापूर दक्षिण' या नावाचा नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात शहरी भाग सोडला तर बहुतांश लोक हे कन्नड भाषिक आहेत.
दक्षिण सोलापूर मतदारसंघाने फक्त राज्यातच नव्हे तर देशातही नेतृत्व दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद असणे हे देखील सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. वि.गु.शिवदारे, आनंदराव देवकते, गुरुनाथ पाटील, रतिकांत पाटील अशा दिग्गजांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विजयाने भाजपची प्रचंड मोठी फळी आता या मतदारसंघात निर्माण झाली आहे.
2009 साली काँग्रेसने माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पत्ता कट करुन शहरी भागातील दिलीप माने यांना उमेदवारी दिली. इकडे शिवसेनेने तत्कालीन आमदार रतिकांत पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं. मात्र तत्कालीन आमदाराचा पराभव करत दिलीप माने यांनी आमदारकी मिळवली. मात्र 2014 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या दिलीप माने यांचा पराभव सुभाष देशमुख यांचा विजय झाला. सुभाष देशमुख यांच्या विजयानं जिल्ह्याला मंत्रीपदही मिळालं.
राज्यभरात काँग्रेस राष्ट्रवादीला लागलेली गळतीने सोलापूर जिल्ह्यातही आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपसाठी अनुकूल असं वातावरण तयार झालं आहे. भाजपकडून पुन्हा एकदा सहकारमंत्री सुभाष देशमुख यानांच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुखांशिवाय सध्यातरी भाजपकडे दुसरा चेहरा या मतदारसंघात नाही. मात्र जर महायुती झाली नाही तर भाजप विरोधात सेनेचा उमेदवार उभा ठाकण्याची शक्यता आहे. गत निवडणूकीत पराभव झालेल्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर हे शिवसेनेकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.
2019 च्या लोकसभेमुळे सोलापूर जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडीचा शिरकाव झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूरच्या भूमीपुत्राचा दबलेला आवाजही आता जोर धरु लागला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण नेते मंडळींमध्ये सत्तेसाठी अप्रत्यक्षपणे संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. मतदारसंघात मेळावा करत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांचे जोरदार विरोध सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी भूमीपुत्रांनाच उमेदवारी द्यावी म्हणून स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. माजी आमदार दिलीप माने, स्वामी समर्थ सुत मिलचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्यातील गटबाजीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची वाताहत झाली आणि ती कायम आहे.
प्रस्थापित नेत्यांना पर्याय देण्यासाठी भूमिपुत्रांनी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे ठरविले आहे. तर वंचितदेखील उमेदवारीसाठी चाचपणी करत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात धनगर आणि लिंगायत सामुदायाची संख्या प्रचंड आहे. या दोन्ही सामुदायांकडूनदेखील उमेदवारीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांची लढाई कोणाविरुद्ध होते, हे पाहावं लागणार आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार
महिला –1 लाख 44 हजार 402
पुरुष –1 लाख 62 हजार 621
इतर – 5
एकूण – 3 लाख 07 हजार 028
2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
सुभाष देशमुख, भाजप - 70,077
दिलीप माने, काँग्रेस–42,954
2019 च्या लोकसभेत दक्षिण सोलापूर विधासभेतून उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 88,691
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 50,913
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी – 28,092
दक्षिण सोलापूर मतदारसंघ : उमेदवारीसाठी सुभाष देशमुखांची दमछाक होणार? विरोधकांकडून अद्याप चाचपणीच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2019 03:28 PM (IST)
दक्षिण सोलापूर मतदारसंघाने फक्त राज्यातच नव्हे तर देशातही नेतृत्व दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद असणे हे देखील सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -