VIDEO | पारिचारकांच्या कानात सांगितलं तरी विठुरायाला सांगितल्यासारखं, जय सिद्धेश्वर स्वामींचा अनोखा सल्ला | एबीपी माझा
मठामध्ये भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात भलेही स्वामी तरबेज असले तरी त्यांना जनतेचे प्रश्नच माहिती नसल्याने असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. काल स्वामींनी दिवसभर पंढरपूर तालुक्यातील गावांचा दौरा केला. गोपाळपूर येथे शेवटची सभा सुरु होताच सभेतील एका तरुणाने गावातील अडचणी सांगण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो तरुण स्वामींना अडचणी सांगू लागला.
यावेळी स्वामींनी 'मालकांच्या (प्रशांत परिचारिक) कानात जरी सांगितले तरी विठुरायाला सांगितल्यासारखे होईल', असे सांगत आपल्या अडचणी त्यांना सांगण्यास सांगितले. यावेळी सभेनंतर आपल्या अडचणी सांगा, असे सांगण्याची वेळ प्रशांत परिचारकांवर आली.
देव तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमचा बोलणारा देव
सुट्टीच्या काळात देवदर्शनाला जाऊ नका. देव तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमचा बोलणारा देव आहे, असे विधान जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. "निवडणुकीच्या काळात सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवसात देवदर्शनाला जाऊ नका. देवाला गेलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव भेटणार नाही, भेटला तर तुमच्याशी बोलणार नाही, बोलला तर म्हणेल आल्या पावली पत जा. तुमचे पैसे खर्च होतील, परंतु समाधान मिळणार नाही. देवाला जा-देवीला जा, कुठेही जा, तुळजाभवानीला जा किंवा पंढरपूरला जा, तिथे देव भेटणार नाही, तो बोलणार नाही. पण बोलणारा देव मी आहे.", असे ते म्हणाले होते.
VIDEO : पाहा काय म्हणाले जय सिद्धेश्वर?
जय सिद्धेश्वर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर सोलापूरमधून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.