मुंबई : आतापर्यंत ज्यांना राष्ट्रवादीचे मावळे मानलं जायचं, त्यांच्याकडून शरद पवारांना धक्का देण्याचं सत्र सुरुच आहे. सचिन आहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजेंनंतर आता राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. 25 ऑगस्टला सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर शिवसेना प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं. हातावर शिवबंधन बांधण्याचा सोपालांचा निर्णय हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय.


मंगळवारी सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बाग़डे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. सोपल यांच्याआधी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे माज़ी आमदार दिलीप माने, मोहळ येथील नागनाथ क्षीरसागर यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला.

VIDEO | काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश | एबीपी माझा



दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी सोपल आमच्या सोबतच आहेत, असा दावा शरद पवारांनी केला होता. पण आज सोपलांनी शिवसेनेत प्रवेश करतं थेट पवारांना खोटं ठरवलं आहे.

दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द

वर्ष                 पक्ष              निकाल

1985   समाजवादी काँग्रेस     विजयी

1990           काँग्रेस               विजयी

1995           अपक्ष                विजयी

1999     राष्ट्रवादी काँग्रेस       विजयी

2004      राष्ट्रवादी काँग्रेस     पराभव

2009          अपक्ष                विजयी

2014      राष्ट्रवादी काँग्रेस      विजयी

सोपल यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील उरल्यासुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडला आहे. तर इकडे महायुतीत चाललेल्या खलबत्यामुळे युती होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बार्शीच्या यंदाची लढाई ही पक्ष केंद्रित न होता दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातच होणार असं दिसतंय. आता पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतात, कोणाला अपक्ष लढावं लागणार हे येणारा काळच सांगेल.