वायनाड (केरळ) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आज आपल्या वायनाड मतदारसंघात एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं. वाडनाड दौऱ्यावरुन निघताना राहुल गांधी यांना एका अतिउत्साही कार्यकर्त्याने त्यांचं चुंबन घेतलं. या प्रकाराने राहुल गांधीही चकित झाले.

हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ग्रे रंगाच्या टी-शर्टमध्ये असलेले राहुल गांधी गाडीच्या पॅसेंजर सीटवर बसून लोकांना हात मिळवून अभिवादन करत होते. त्याचवेळी निळ्या शर्टमधील एका व्यक्तीने आधी राहुल गांधींसोबत हात मिळवला, मग काही कळायच्या आत त्यांच्या गालाचं चुंबन घेतलं.

यानंतर एकाने चुंबन घेणाऱ्याला मागे ओढलं. तर या प्रसंगामुळे राहुल गांधीही काहीसे गोंधळले. मात्र ते लोकांना कारमधून हात मिळवत अभिवादन करत राहिले.


याआधीही राहुल गांधींचं चुंबन
राहुल गांधी यांचं चुंबन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातमधील एका महिलेने त्यांच्या गालाचं चुंबन घेतलं होतं. योगायोग म्हणजे हा प्रसंग 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेन्टाईन्स डे रोजी घडला होता.

तर  2014 मध्ये पश्चिम बंगालमधील एका मिठाईच्या दुकानातही प्रचारादरम्यान एका पुरुषाने राहुल गांधींचं चुंबन घेतलं होतं.

राहुल गांधी केरळ दौऱ्यावर
चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील आज दुसरा दिवस आहे. राहुल गांधींनी आज पूरग्रस्तांची भेट घेतली. ते पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार असून 30 ऑगस्ट रोजी दौरा आटोपून दिल्लीला परत जातील अशी शक्यता आहे. वायनाड हा केरळमधील पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सुमारे 50 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.