अमेठी : काँग्रेसचा गड मानला जाणारा अमेठी मतदारसंघ आता भाजपने खेचून आणला आहे. गेल्यावेळी पराभवाचा सामना केलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना धूळ चारत गड काबीज केला.


ज्या अमेठीला लोक गांधी परिवाराच्या नावाने ओळखायचे त्या अमेठीला आता 'अमेठीची दीदी' म्हणजेच स्मृती इराणी यांची नवी ओळख मिळाली आहे.

स्मृती इराणी यांचा हा विजय चित्रपटाच्या कथेला शोभेल असाच आहे. हा करिष्मा स्मृती इराणी यांनी केवळ पाच वर्षात करून दाखवला, ज्याची गेल्या 15 वर्षांपासून भाजप वाट पाहून होती.

2014 साली अवघे 23 दिवस आधी त्यांना अमेठीच्या मैदानात राहुल गांधींच्या विरोधात उतरवलं. त्यावेळी स्मृती इराणी निवडणूक हरल्या मात्र 3 लाखाहून अधिक लोकांची मतं घेत त्यांनी लोकांची मनही जिंकली.

जिद्दी आणि आपल्या निर्धाराच्या पक्क्या असलेल्या स्मृती इराणी यांनी त्याचवेळी 2019 च्या लढतीची तयारी सुरु केली. 2014 साली निवडणूक हरल्यानंतर 15 दिवसांनीच त्यांनी पुन्हा अमेठीत जात धन्यवाद सभा घेतल्या. यामुळे अमेठी भाजप आणि राहुल गांधींच्या विरोधकांना स्मृती यांच्या रूपाने नवा पर्याय मिळाला होता.

लोकांना अशा पद्धतीने केलं आपलंस

2014 पासूनच स्मृती इराणी यांनी प्रत्येक दोन ते तीन महिन्यांनी अमेठीच्या दौऱ्यांचा सपाटा लावला. या दौऱ्यांमध्ये त्यांच्यासमोर अनेक गोष्टी आल्या. या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सरळ लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. सोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सहयोगाने रस्ते, आरोग्य शिबिरं, विद्युत उपकेंद्र, दिव्यांग मेळावे, विकास भवन, युवकांना रोजगार यांसारखी अनेक काम केली. यामुळे खासदार ना होता देखील स्मृती या अमेठीच्या लोकांच्या अपेक्षांचे केंद्र ठरू लागल्या. एका रिपोर्टनुसार अमेठी लोकसभा क्षेत्रात गेल्या एका वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून जवळपास एक हजार कोटींची विकासकामं झाली.

स्मृती यांच्या या प्रयत्नांना पक्ष आणि सरकारकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला,. स्मृती यांनीआपल्या राष्ट्रीय ओळखीचा चांगलाच वापर इथं करून घेतला. याचमुळे अत्याधुनिक रायफल ak-203 च्या निर्मितीच्या वेळी पंतप्रधान मोदींनी अमेठीच्या ऑर्डिनंस फॅक्टरीची निवड केली. पाच वर्षात मोदींनी दोनवेळा, अमित शाह यांनी चार वेळा तर योगी आदित्यनाथ यांनी सहा वेळा अमेठीचा दौरा केला.
महिलांमध्ये खास आकर्षण
स्मृती इरानी यांच्या अमेठीच्या विजयात महिलांचा मोठा वाट राहिला आहे. स्मृती इराणींनी प्रत्येक महिन्यात ग्राम पंचायतआणि ब्लॉक स्तरांवर महिलांच्या नुक्कड सभा घेतल्या. महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. यामुळे महिलांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत गेला.

स्मृती इराणी यांनी सुरुवातीपासून जोरदार प्लॅनिंग केली. 2014 पासूनच स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये विधानसभा स्तरावर आयटी सेल स्थापित केले. एवढेच नाही तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2-2लोकांची नियुक्ती देखील केली. ही लोकं त्या-त्या क्षेत्रातील समस्या आणि राजकीय चर्चा इराणींपर्यंत पोहोचवत होते.

सोबतच इराणी यांनी काँग्रेससह सपा, बसपा, आणि अन्य पक्षातील स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये आणले.

या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजेच स्मृती इराणी यांचा विजय.